हॉटेल्स, फार्महाऊसवरही करडी नजर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष किंवा त्यांच्या उमेदवारांच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे व त्यासाठी पुरेशी यंत्रणाही आयोगाने तयार करण्याच्या सूचना संबंधित जिल्ह्यातील प्रशासनाला दिल्या आहेत.

नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. ३८ प्रभागांतून एकूण १५१ सदस्य जनतेला निवडून द्यायचे आहेत. अद्याप निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली नसली तरी मोर्चेबांधणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकीच्या काळात सर्वस्तरावरील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. तरीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पक गोष्टींचा वापर केला जातो. यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. रोख व्यवहार या काळात मोठय़ा प्रमाणात होतात. तसेच बाहेरून रोख शहरात येण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल्स आणि शहराच्या सीमावर्ती भागातील नेत्यांचे फार्म हाऊस यावर निरीक्षकांची नजर असेल. हवाला किंवा दलालांच्या माध्यमातून होणाऱ्या तसेच बँकामार्फत होणाऱ्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येईल, असे आयोगाचे सचिव एस.एम. चन्न्ो यांनी त्यांच्या १२ जानेवरीच्या आदेशात स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ४ लाख रुपये निर्धारित करून दिली आहे. निवडणुकीवर होणाऱ्या खर्चासाठी उमेदवाराला स्वत:चे नवे बँक खाते उघडावे लागणार असून त्या माध्यमातूनच खर्च करावा लागणार आहे. त्याचा हिशेबही निवडणूक निरीक्षकांना सादर करावा लागेल. या खर्चाचे लेखा परीक्षण करण्याची व्यवस्थाही आयोगाकडून करण्यात आली आहे. निर्धारित काळात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्यास कारवाईची तरतूदही नियमात आहेत.

निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पडाव्या म्हणून केलेल्या उपाययोजनांचा हा एक भाग आहे. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा प्रलोभन देऊन आपल्या बाजूने मतदान व्हावे म्हणून मोठय़ा  प्रमाणात पैशांचा वापर केला जातो, अशा तक्रारी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केल्या जातात. अलीकडेच जिल्ह्य़ात पार पडलेल्या पालिका निवडणुकीच्या वेळी काटोल येथे याच मुद्दावरून भाजप आणि विदर्भ माझा या पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद झाला होता. हे येथे उल्लेखनीय.

निवडणूक निरीक्षकांची कामे

  • आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे
  • उमेदवाराकडून होणाऱ्या वस्तू वाटपाकडे लक्ष
  • रोख व्यवहारावर नजर
  • विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल्स, फार्म हाऊसवर लक्ष
  • हवाला, दलाल यांच्या व्यवहारावर नजर
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commissions attention on financial transactions
First published on: 20-01-2017 at 01:08 IST