लोकसत्ता टीम
भंडारा: कृषी पंपासाठी बेकायदेशररित्या वीजचोरी केल्याप्रकरणी लाईनमनकडून साहित्य जप्त करून वीज विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले. या प्रकरणात वीज चोरट्यानी विद्युत विभागाचे कार्यालय गाठून कार्यालयात काम करणाऱ्या लाईनमनला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक केंद्रात उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी शुभम प्रभू हुमणे (२९) आणि प्रभु लक्ष्मण हुमणे (५५) दोघे पिता- पुत्र, रा. गिरोला, यांना अटक करून गुन्हा दाखल केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत विभागाच्या पिंपळगाव सडक कार्यालयात कार्यरत कर्मचारी राहुल सुरजलाल पोवरे, कमलेश्वर नवखरे, कनिष्ठ अभियंता नासिक आदमाने, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रभाकर मडावी आणि शीतल आत्राम हे सर्व कर्मचारी किटाडी, गिरोला येथील कृषिपंपधाराकांकडून विद्युत बिल वसुलीसाठी गेले होते.
आणखी वाचा- नागपूर : संपामुळे नागपुरात सगळ्याच शस्त्रक्रिया ठप्प; गरीब रुग्णांचे हाल सुरूच
यादरम्यान गिरोला गावातील शेतकरी शुभम हुमणे यांना त्यांच्या शेतात बेकायदेशीरपणे विद्युत तार टाकून वीज चोरी करताना पकडले. चोरीसाठी वापरण्यात आलेली वायर जप्त करून पिंपळगाव येथील कार्यालयात जमा करण्यात आली. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता सर्व कर्मचारी वीज बिल जमा करण्यासाठी पिंपळगाव कार्यालयात कामात व्यस्त होते. त्याच वेळी शुभम हुमणे आणि प्रभू हुमणे हे दोघेही कार्यालयात पोहोचले आणि लाइनमन राहुल पोवारे यांच्याशी भांडण सुरू केले. तसेच कार्यालयातील खुर्चीची मोडतोड केली. आरोपी शुभम व प्रभू यांनी वीज कर्मचाऱ्यांना धमकावले व पुन्हा गिरोला गावात आल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
आणखी वाचा- गोंदिया : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! महाराष्ट्र एक्सप्रेस ‘या’ दिवशी रद्द, कारण…
पोवारे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कोरचे करीत आहेत.