नागपूर : अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. सध्या अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच अर्जाचा दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ‘सीबीएसई’सह इतर शिक्षण मंडळांचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

निकाल जाहीर होताच अर्जाचा दुसरा भाग कधी भरता येणार, याची उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत २१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्जाचा भाग-१ पूर्ण केला आहे. त्यापैकी १४ हजार २५० विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज ‘लॉक’ केले आहेत. सीबीएसईचा निकाल लागल्यानंतरच ११वी प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू होईल, अशी शक्यता आहे. सीबीएसई व आयसीएसई मंडळाचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवडय़ात अपेक्षित आहेत. त्यानंतरच प्रवेश प्रक्रिया गतिमान होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीबीएसई निकालाच्या पूर्वीच अर्जाच्या भाग-२ची नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या कमी आहे. शिवाय विविध प्रवेश परीक्षांसाठी बारावीत चांगली टक्केवारी मिळावी यासाठी सीबीएसईचे विद्यार्थी राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. दरवर्षी जवळपास ५००० विद्यार्थी केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या माध्यमातून प्रवेश घेतात. यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लवकरच जाहीर झाला. मात्र, अन्य मंडळाचा निकाल जाहीर झालेला नसल्याने अर्जाचा दुसरा भाग भरण्याची प्रतीक्षा सुरू आहे.