२४ तासांत आणखी २० कर्मचारी निलंबित; एसटीच्या नागपूर विभागातील स्थिती

नागपूर : नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील आणखी संपावरील २० एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यामुळे येथील आजपर्यंत एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या टक्क्यांवर गेल्यावरही येथील वाहतूक ठप्पच होती. त्यामुळे येथील प्रवाशांचे हाल कायम आहे.

नवीन निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये रामटेक आगारातील १० आणि उमरेड आगारातील १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर विभागातील आजपर्यंतच्या निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४२० वर पोहचली आहे. तर रोजंदारी गटातील विभागातील सर्वच्या सर्व ९० कर्मचाऱ्यांच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सेवा समाप्त करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर विभागात एसटीचे हजेरीपटावर प्रशासकीय स्तरावरील ४८६, कार्यशाळा स्तरावरील ५५८, चालक गटातील ८९७, वाहक गटातील ६७१ असे एकूण २ हजार ६१२ कर्मचारी आहेत. त्यातील पाचशेच्या जवळपास कर्मचारी सेवेवर आहेत. तर ९४ च्या जवळपास कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहेत.

विदर्भात केवळ ४ बस धावल्या

शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केल्यावर आंदोलकांत फाटाफूट होऊन बरेच कर्मचारी कामावर परतले होते. त्यामुळे विदर्भातील वर्धा, भंडारासह एखाद जिल्ह्यात एक- दोन दिवस सातत्याने दिवसाला ६ ते ८ बसेस धावल्या होत्या. परंतु बुधवारी विदर्भात संध्याकाळी ६ वाजतापर्यंत वर्धेत ३ आणि भंडाऱ्यात १ अशा केवळ ४ बस धावल्या. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.