लोकसत्ता टीम
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेकडो घरांची पडझड झाली होती. दरम्यान, नुकसान भरून काढण्यासाठी संबंधित विभागाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यात जिल्ह्यातील २२२ गावातील घर, गोठ्यांची पडझड झाल्याची नोंद करून तसा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. मात्र, शासनाकडून या आपत्ती ग्रस्तांकडे दुर्लक्ष होत असून केलेला पंचनामा केवळ देखावा ठरू लागला आहे. पंचामाना करून वर्ष लोटत असताना आतापर्यंत एकाही आपत्तीग्रस्ताला नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपत्तीग्रस्तांमध्ये शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षित असा पाऊस झाला नाही. विशेष म्हणजे, पावसाचे महत्त्वाचे नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. विशेष म्हणजे, पावसाचा जुलै महिना अर्धा-अधिक कोरडा गेला. मात्र, ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली. ज्यात घरे आणि जनावरांचे गोठे जमीदोस्त झाले.
आणखी वाचा-एमपीएससी : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे; परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधी…
दरम्यान, नुकसान भरपाईसाठी शासनाने पंचनामा सुरू केला. यावेळी जिल्ह्यातील २२२ गावांतील नागरिकांच्या घरांचे व पशुधनाच्या शेडचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. तर या आपत्तीगस्तांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तसा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, आजतागायत एक दमडीही आपत्ती ग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचे या २२२ गावातील आपत्तीग्रस्तांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे आपत्तीग्रस्तांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय गावांचा समावेश
गतवर्षीच्या पावसात २२२ गावात नुकसानीची नोंद केली असता त्यात गोंदिया तालुक्यातील ८ गावांचा समावेश असून आमगाव तालुक्यातील ११, सालेकसा ११, देवरी ७७, अर्जुनी मोरगाव ३४, सडक अर्जुनी २९, तिरोडा ३६, व गोरेगाव तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे.
आणखी वाचा-एका लग्नाची गोष्ट : नवरदेव जर्मनीचा अन् नवरी गोंदियाची; विदेशी पाहुणे वरातीत थिरकले अन्…
२०२२ च्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांचे नुकसान झाले. नुकसान भरून काढण्यासाठी पंचनामा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. पण त्याचा अद्याप पर्यंत निधी मिळालेला नाही. निधी मिळताच नुकसानभरपाईची रक्कम पीडितांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. -राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गोंदिया