चंद्रपूर : बल्लारपुरातील मिलिंद ट्रेडिंग कंपनी (मद्यविक्री दुकान)चे भागीदार पवन जयस्वाल यांनी तळघरातच बनावट देशी दारूचा कारखाना थाटला होता. तिथेच बनावट देशी दारू तयार करून ‘लेबलिंग’ केले जात होते. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या छाप्यात देशी दारूच्या बाटल्या, विविध कंपन्यांचे ‘स्टीकर’ जप्त करण्यात आले.
या दुकानाचा परवाना नागपुरातील अश्वजीत गाणार यांचा आहे. दरम्यान, दुसरा आरोपी श्रवण जयस्वाल फरार आहे. राजकीय आशीर्वादाने जयस्वाल बंधूंचा बनावट दारूचा व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे, दारू व्यवसायाशी संबंधित भद्रावतीच्या एका राजकीय पुढाऱ्याने जयस्वाल यांची सोमवारी भेट घेतली.
दारूबंदी असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची तस्करी सुरू होती. मात्र, आता दारूबंदी उठल्यानंतरही बनावट दारू तस्करी व विक्री जोरात सुरू आहे. मिलिंद ट्रेडिंग कंपनी या एकाच दुकानावर दोन वेळा छापा टाकून बनावट दारू जप्त करण्यात आली. पहिल्या कारवाईनंतर या दुकानाचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला हाेता. तसेच प्रवरानगर येथील कंपनीने या दुकानाला रॉकेत तथा इतर देशी दारू देणे बंद केले होते.
मात्र राजकीय नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने या दुकानाचे निलबंन तसेच बंदी कालांतराने शिथिल झाली. दरम्यान, आपले कुणी काहीच बिघडवू शकत नाही या थाटात पवन व श्रवण जयस्वाल यांनी पुन्हा बनावट दारूची तस्करी व विक्री सुरू केली. यावेळी तर जयस्वाल यांनी थेट स्वत:च्या निवासस्थानातील तळघरातच देशी दारूचा ‘बॉटलिंग प्लान्ट’ सुरू केला. तिथेच बनावट देशी दारू तयार केली जायची आणि त्यावर कंपनीचे ‘लेबल’ लावून बाजारात विक्री केली जायची.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक धार्मिक यांनी जयस्वाल यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तळघरात मोठ्या प्रमाणात बाटल्या, देशी दारूचे लेबल व इतर साहित्य मिळाल्याचे धार्मिक यांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपी पवन जयस्वाल यांना अटक झाल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली होती. विशेष म्हणजे, कोठडीतही चौकशीच्या नावाखाली जयस्वाल यांना अतिविशिष्ट सेवा पुरवण्यात येत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच दारू व्यवसायाशी संबंधित आणि या दुकानाचे भागीदार असलेल्या भद्रावती येथील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने सोमवारी त्यांची भेट घेतली. राजकीय व्यक्तीची ही भेटही दारूविक्रेत्यांच्या वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.
‘परवाना रद्द करा’
सातत्याने बनावट दारू विक्री होत असलेल्या मिलिंद ट्रेडिंग कंपनीचा परवाना तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मद्यशौकिनांनी केली आहे. नागपुरातील अश्वजीत गाणार यांच्या नावाचा हा परवाना असून त्यांनाही उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावली असल्याची माहिती अधीक्षक धार्मिक यांनी दिली. या प्रकरणातील दुसरा आरोपी श्रवण जयस्वाल फरार असल्याचे धार्मिक यांनी सांगितले. मात्र, तो सोमवारी बल्लारपुरात होता, तसेच तो अनेकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. उत्पादन शुल्क विभागालाच तो कसा मिळत नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.