अकोला : चंद्र पृथ्वीभोवती आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरताना जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा निसर्गातील सावल्यांचा खेळ अर्थात ग्रहण स्थिती अनुभवता येते. आज, ७ सप्टेंबर रोजी चंद्र सुमारे साडेतीन तास पृथ्वीच्या छायेत राहणार आहे. या वर्षातील आजचे एकमेव खंडग्रास चंद्रग्रहण बघता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.

सध्या सुरू असलेल्या वर्षात सूर्य व चंद्र अशी प्रत्येकी दोन प्रमाणे चार ग्रहणे आहेत. यापैकी फक्त एकच ग्रहण आपल्या भागात आज, ७ सप्टेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण बघता येणार आहे. या आधीचे १४ व २९ मार्चला झालेले चंद्र-सूर्य ग्रहण, तसेच येणाऱ्या अमावास्येला होणारे सूर्यग्रहण आपल्या भागात बघता येणार नाही, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.

भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला रात्री ९.५७ वाजता आपल्या डाव्या बाजूकडून चंद्रबिंब पृथ्वीच्या सावलीत येताना ग्रहण प्रारंभ होईल. यावेळी चंद्र कुंभ राशीत आणि सूर्य अगदी विरुद्ध बाजूला सिंह राशीत एकविसाव्या अंशावर असतील. रात्री ११.४१ वाजता ग्रहणामध्ये, तर मध्यरात्री १.२६ वाजता चंद्रग्रहण मुक्त होईल. आकाशात चंद्र ग्रहण स्थितीत चंद्रा जवळच्या भागात मीन राशीतील शनी ग्रह पूर्णवेळ उपस्थित असून खग्रास ग्रहण स्थितीत शनी ग्रहाचे दर्शन अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल. अवकाश प्रेमींसह सर्वांना चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सावल्यांचा अनोखा खेळ अनुभवता येणार आहे, असे खगोल अभ्यासक प्रभाकर दोड म्हणाले.

चंद्रग्रहणाचे वैज्ञानिक कारण काय?

पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावली भोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नसल्याची माहिती दिली.