scorecardresearch

किशोर तिवारी यांची शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी; ‘लोकसत्ता’ने प्रकरणाकडे वेधले होते लक्ष

देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये विशेष अध्यादेश काढून, राज्यमंत्री पदाचा दर्जा देत शेती अभ्यासक तिवारी यांची शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

किशोर तिवारी यांची शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी; ‘लोकसत्ता’ने प्रकरणाकडे वेधले होते लक्ष
किशोर तिवारी यांची शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी

महाराष्ट्र शासनाच्या कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदावरून किशोर तिवारी यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले असून, पुढील आदेशापर्यंत शेती स्वावलंबन मिशनची सूत्रे अमरावती विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहेत.

हेही वाचा- नागपूर : दुचाकीने कर्तव्यावर जात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडकली ‘आपली बस’

लोकसत्ता’ने वेधले होते लक्ष

गेल्याच आठवड्यात ‘लोकसत्ता’ने किशोर तिवारी यांच्या कार्यकाळातील शेती स्वावलंबन मिशनच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वृत्त प्रकाशित करून या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. हे विशेष. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनास ठोस उपाययोजना करता याव्या म्हणून युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये विशेष अध्यादेश काढून, राज्यमंत्री पदाचा दर्जा देत शेती अभ्यासक तिवारी यांची शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सत्तांतर झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तिवारी यांना पदावर कायम ठेवले होते.

आठ वर्षांत शेतकरी आत्महत्येचा प्रश्न अधिक बिकट

शेती स्वावलंबन मिशनवर कोट्यवधींचा खर्च करूनही गेल्या आठ वर्षांत शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट झाला आहे. आता राज्यात पुन्हा सत्तांतर झाल्यानंतर तिवारी यांनी शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून राज्य सरकारचीच कोंडी करून अध्यक्षपदी कायम राहण्याची धडपड चालवली होती. मात्र, याच दरम्यान गेल्या आठवड्यात शिवसेनेने तिवारी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी अधिकृत नियुक्ती केली. त्यामुळे विरोधी पक्षाचा प्रवक्ता शासनाच्या अखत्यारीतील शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदी कसा, असा प्रश्न सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला होता. शिवाय ‘लोकसत्ता’नेही तिवारींच्या कार्यकाळातील स्वावलंबन मिशनच्या अपयशाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. परिणामी शासनाने त्यांची या पदावरून हकालपट्टी केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा- चित्त्यांवरून आता राजकीय वाद, श्रेयाची लढाई ; काँग्रेस- भाजप नेते समोरासमोर

भाजपच्या दबावामुळे हकालपट्टी

बहुराष्ट्रीय कंपन्यांची चाकरी करणारी नोकरशाही व कृषिमंत्र्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीने कृषी संकट गडद झाले आहे. या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरमरीत पत्र लिहून जाब विचारल्याने भाजपच्या दबावात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली, अशी प्रतिक्रिया किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extrusion of kishore tiwari from the post of chairman of agriculture swavalamban mission dpj

ताज्या बातम्या