नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर चलनामध्ये नवीन नोटा आलेल्या आहेत. मात्र यावरही ठगबाजानी उपाय शोधला आहे. हल्ली बाजारात अनेक बनावट नोटा आले असून नागरिक त्याला बळी पडत असल्याचे प्रकरण समोर आलेला आहे. त्यामुळे आपण रोख व्यवहार करताना सावधान राहणे आवश्यक आहे.

सणासुदीच्या तोंडावर उपराजधानीतील चलनात बनावट नोटा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील १५ दिवसांतच तीन वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तीनही गुन्हे हे बँक किंवा एटीएमच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात मिळण्याचे प्रयत्न झाले. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे यातील एका प्रकरणाचा खुलासा स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून झाला, तर दोन गुन्हे थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात आढळलेल्या बनावट नोटांच्या आधारे दाखल झाले. जर या मोठ्या बँकांमध्येच बनावट नोटा आढळल्या आहेत, तर शहरात इतर चलनात या नोटा किती प्रमाणात फिरविण्यात आल्या आहेत, हा मोठा प्रश्न यंत्रणांसमोर उपस्थित झाला आहे.

सणासुदीच्या कालावधीत रोखीद्वारेच अनेकांकडून व्यवहार करण्यात येतात. विशेषतः किराणा सामान, दागिने, कपडे घेताना रोखीवरच भर असतो. गर्दीच्या ठिकाणी बनावट नोटा सहज खपविल्या जातात. बनावट नोटांना वेळीच ओळखून पोलिसांना त्याची माहिती देणे महत्त्वाचे ठरते. बँकांमध्ये नोटा आढळल्यावर तक्रार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे व अनेकदा ग्राहकांनादेखील त्यांच्याकडे बनावट नोटा कुठून आल्या याची कल्पना नसते. या वेळखाऊ प्रक्रियेत यामागील खरे आरोपी सहज निसटून जातात.

आरबीआयमध्ये देखील बनावट नोटा

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयातील ‘बॉक्स’मध्येदेखील बनावट नोटा आढळल्याचा प्रकार समोर आला. संबंधित नोटा फेब्रुवारी व मे महिन्यात बॉक्समध्ये टाकण्यात आल्या होत्या. संबंधित टीएलआर बॉक्समध्ये जुन्या व फाटक्या नोटा बदलून मिळतात. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड, बँकेचे तपशील द्यावे लागतात. या बॉक्समध्ये फेब्रुवारी महिन्यात १०० रुपयांच्या ११ बनावट नोटा आढळल्या. त्या प्रकरणात सहायक व्यवस्थापिका भैरवी खरतड यांच्या तक्रारीवरून भूषण दिलीप पाटील (वय ३५, चितोड मार्ग, धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मे महिन्यात पाच बनावट नोटा आढळल्या. त्या नोटा निहारिका नावाच्या तरुणीने बॉक्समध्ये टाकल्या होत्या. तिला बँकेत बोलविण्यात आले. मात्र, तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने खरतड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट नोटा आढळल्यावर प्राथमिक तपासणीनंतरच बँकाकडून तक्रार करण्यात येते. हे दोन्ही गुन्हे याच आठवड्यात दाखल झाले आहेत.