लोकसत्ता टीम
अमरावती: जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सोयीच्या ठिकाणी बदली व पदस्थापना घेण्यासाठी अनेक शिक्षकांनी दुर्धर आजार आणि अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यासंदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.




बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली घेणाऱ्या अमरावती विभागातील दोन हजारावर शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी व वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले.
अनेक शिक्षकांनी अपंग असल्याचे, दुर्धर आजार असल्याचे बनावट दस्तऐवज तयार करून बदल्या करून घेतल्या आहेत. हा गंभीर प्रकार महेश ठाकरे यांनी समोर आणला. या बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग १ मध्ये दिव्यांग, विविध गंभीर आजार व संवर्ग २ मध्ये पतीपत्नी एकत्रिकरणाचा समावेश होतो. या दोन्ही संवर्गात बदलीमध्ये सुविधा आहे. यासाठी त्यांना प्रमाणपत्र दाखल करावे लागते. परंतु या बदली प्रक्रियेत लाभ घेतलेल्या कित्येक शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र दाखवून बदलीचा लाभ घेतल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे आहेत, असा आरोप देखील यावेळी प्रहारच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे अशा सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यासह दुर्धर आजार, अपंगत्वाची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी यावेळी निवेदनाव्दारे प्रहारचे महेश ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
अचानक शिक्षकांमधील दिव्यांग व गंभीर आजाराचे प्रमाण वाढले कसे, अमरावती विभागातील २ हजार शिक्षक अचानक दिव्यांग कसे हा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला पडत नाही का, कर्णबधीर असलेल्या शिक्षकांपैकी किती शिक्षकांकडे श्रवणयंत्र आहे, मेंदूविकार किवा गंभीर आजारी असणाऱ्या शिक्षकांनी चार- पाच वर्षात शाळेतून उपचारासाठी दीर्घ रजा घेतल्याची नोंद आहे का, अनेक शिक्षक २०१८ नंतर कागदोपत्री दिव्यांग होत आहे याचे कारण काय, कर्णबधीर, अल्पदृष्टी दिव्यांग असे प्रमाणपत्र असलेल्या अनेक शिक्षकांकडे वाहन चालवण्याचा परवाना कसा, असे प्रश्न महेश ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.