गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी येथील शेतकरी शेतात जात असताना रानडुक्कराच्या एका कळपाने त्यांना धडक दिली. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना फुरडी – हेटी गावालगत आज, शुक्रवारी घडली.

फुरडी हेटी, वढोली शेतशिवारात रानडुक्करांनी हैदोस घातला आहे. गावातील नागरिकांना दहशतीत जीवन जगावे लागत आहे दररोज रानडुक्करांचे हल्ले शेतकऱ्यांवर होत आहेत. आज घरून शेतात जाताना फुरडी हेटी येथील शेतकरी अविनाश भगवान निखाडे वय (४८) सकाळी ८ च्या दरम्यान घरून निघाले. थोड्या अंतरावर गावाच्या बाहेर पडताच रानडुक्कराच्या कळपाने अचानक त्यांना जबर धडक दिली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात गोंडपिपरी दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

शासनाने तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.