भंडारा : आज सकाळी सात वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात एक शेतकरी फुले वेचत होता. वेचता वेचता त्यांच्या समोर उभा ठाकला साक्षात वाघोबा. मात्र, या धाडसी शेतकऱ्याने घाबरून न जाता वाघाच्या डोळ्यात डोळे टाकून हळूवार एक एक पाऊल मागे टाकण्यास सुरुवात केली.

तोच वाघाने त्यांच्या अंगावर उडी घेतली. शेतकऱ्याने आरडाओरडा करताच वाघाने पळ काढला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला. काही वेळनंतर बाजूच्या शेतात कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रक्तबंबाळ अवस्थेत दिसलेल्या शेतकऱ्याला ताबडतोब रुग्णालयात हलविले.

साकोली तालुक्यात सध्या वाघ आणि बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या सुद्धा जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना शेतात काम करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्याचे धाडस करीत नाही ज्यामुळे शेतीची कामे प्रभावित होत आहे. अशाच कारणावरून नुकतेच दोन वाघिणीना जेरबंद करण्यात आले आहे हे विशेष.

साकोली तालुक्यातील मोहघाटा गावातील शेतात फुले तोडण्यासाठी गेलेले शेतकरी दूधराम राजीराम मेश्राम (४१) यांच्यावर अचानक वाघाने हल्ला केल्याने ते जखमी झाले. आज दि. ६ एप्रिल रोजी ही घटना घडली. या घटनेमुळे साकोली परिसरात  भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दूधराम मेश्राम हे आज सकाळी सात वाजता शेतात फुले वेचण्यासाठी गेले होते. साडेसातच्या सुमारास त्यांना वाघ दिसला. न घाबरता ते हळूहळू पाऊल मागे टाकू लागले. मात्र, त्यानंतर वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून दोन्ही पंजांनी त्यांच्या पोटावर घाव केले. अखेर दुधराम यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे वाघाने तेथून पळ काढला.

मात्र, रक्तबंबाळ दुधराम शेतात निपचित पडून होते. काही वेळाने जवळच्या शेतात कामासाठी आलेले शेतकरी तेथे पोहोचले, त्यानंतर दुधराम यांनी त्यांना मदतीसाठी बोलावले. माहिती मिळताच साकोली पोलीस स्टेशन व वनविभागाच्या पथकाने वनरक्षक राधेश्याम एस.भराडे, बाळू निचेत, रुपाली रावत, सी.आर. घटनास्थळी पोहोचले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी शेतकऱ्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस अधिकारी गौतम थुलकर व मनोहर कांबळे अधिक तपास करत आहे. २२ मार्च रोजी भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोना ॲग्रो इंडस्ट्रीजच्या मागे असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याने हल्ला करून १५ ते १७ कोंबड्यांना ठार केले होत्या.  या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी मोना ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक अरुण गुप्ता व व्यवस्थापक बद्दू उमाडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.