अकोला : केंद्र शासनाकडून हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीन, मुग, उडीद मालाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली.

केंद्र शासनाने सोयाबीनसाठी १८ लाख ५० हजार ७०० मे.टन, मूग ३३ हजार मे.टन व उडीद तीन लाख २५ हजार ६८० मे.टन खरेदी मंजुरी दिली. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासन आणि शेतकरी यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही, या दृष्टीने खबरदारी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खरेदी केंद्र आणि गोदाम दोन्ही ठिकाणी नाफेडचे ग्रेडर नियुक्त करण्यात येणार आहेत. बारदाना, संकलन गोदाम याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

९० दिवसांसाठी खरेदी सुरू होणार

हमीभाव योजनेंतर्गत ३० ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व १५ नोव्हेंबर २०२५ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील ९० दिवसांसाठी खरेदी सुरू करण्यात येत आहे. सोयाबीन, मुग, उडीद आदी शेतमालाचे भाव खुल्या बाजारपेठेत पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सोयाबीनसह इतर शेतमाल हमीभाव खरेदी करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

३० ऑक्टोबरपासून आम्ही भावावर शासकीय खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्पष्ट केले. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. या निर्णयामुळे सोयाबीन, मुग, उडीद मालाची हमीभावाने खरेदी होणार आहे. सोयाबीन हमीभावावर खरेदीसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची अडचण प्रभावीपणे मांडली होती. त्या संदर्भात राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर केंद्र शासनाकडून हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीन, मुग, उडीद मालाची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यापूर्वी नोंदणी सुरू केली. बाजारपेठेत पडलेले दर लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग खुल्या बाजारात कमी भावात न विकता नोंदणी करून शासकीय हमीभावाने विक्री करावी, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.