अकोला : वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील देऊरवाडी येथील अत्यल्प भूधारक शेतकरी सुनील आडे यांचा मुलगा धीरज याने जिद्द व चिकाटीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. ‘यूपीएससी’ची परीक्षा उत्तीर्ण होत धीरज आडे याने ‘नर्सिंग अधिकारी’ पदाला गवसणी घातली आहे. या यशामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत लाखो तरुण तयारी करीत असतात.

अनेक वर्षांपासून महागडे शिकवणी वर्ग लावून परीक्षेमध्ये यश मिळवण्याचे प्रयत्न करतात. मात्र, प्रत्येकाच्याच पदरी यश येत नाही. वाशीम जिल्ह्यातील धीरज आडे या तरुणाने सातत्यपूर्ण अभ्यासातून यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण होताच राज्य शासनाची ‘नर्सिंग स्टाफ’ पदी नेमणूक झालेल्या धीरज आडे या विद्यार्थ्याने न थांबता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नर्सिंग अधिकारी पदाची तयारी केली. त्या परीक्षेत यश मिळवून त्याने आपल्या कुटुंबीयांसह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.

वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती

धीरज आडे याच्याकडे वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती आहे. अपार कष्ट करून त्यांचे वडील सुनील आडे यांनी दोन्ही मुले सुरज व धीरज यांच्या शिक्षणाची वाट मोकळी करून दिली. मुलांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिले नाही. धीरज आडे याचे चौथीपर्यंतचे शिक्षण देऊरवाडी येथेच झाले. पुढील शिक्षण त्याने मानोरा शहरातील रवींद्रनाथ टागोर महाविद्यालयात घेतले. अमरावती येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेत असतानाच धीरज आडे याने वैद्यकीय पूर्व परीक्षेची तयारी केली. डॉक्टर होण्याच्या संधीने हुलकावणी दिल्यावर हार न मानता पुण्यातील ससून रुग्णालयात धीरजने नर्सिंग विषयात २०२२-२३ यावर्षी पदवी प्राप्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या भावाने नोकरी करून लावला शिक्षणाला हातभार

पुण्यातील शिक्षणादरम्यान लहान भावाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने मोठा भाऊ सुरज यांनी तीन वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. धीरजच्या शिक्षणात आई-वडिलांसमवेत हातभार लावला. आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट व आपल्यासाठी भाऊ सुद्धा परिश्रम करीत असल्याची जाणीव ठेवत ‘ब’ वर्ग अधिकारी पदाची तयारी धीरजने केली. लोकसेवा आयोगाच्या राज्य विमा महामंडळातील नर्सिंग अधिकारी पदाची परीक्षा त्याने उत्तीर्ण केली.