नागपूर : अजनी येथील बदामी पार्क रस्स्तावर शुक्रवारी भर दिवसा शाळकरी मुलीचा सुरा खुपसून खून करणाऱ्या अल्पवयीन मारेकऱ्याला गुन्हे शाखा पथक चारने रात्री ताब्यात घेतले. कपीलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नारा मार्गावर हा मारेकरी पथकाच्या हाती लागला. अल्पवयीन मारेकऱ्याचे वडीलही कुख्यात असल्याची माहिती मिळत आहे. रामबाग परिसरात राहणाऱ्या त्याच्या वडिलावर इमामवाडा पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
शुक्रवारी संत अँथोनी शाळेच्या पाठभिंतीला लागून असलेल्या रस्त्यावर ज्या ठिकाणी भर दिवसा हे थरार नाट्य घडले, तो रेल्वे कॉलनीचा परिसर अत्यंत जुना आहे. त्यामुळे परिसरात एकही सीसीटीव्ही नाही. त्यामुळे फरार मारेकऱ्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र मृतक मुलीच्या घरी पोलिसांना हाती लागलेल्या फोटोने पोलिसांसमोरचे आव्हान शिथील केले. या फोटोच्या आधारावर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांवर पाळत ठेवणे सुरू केले.
हे हत्याकांड घडताच घटनास्थळी धाव घेतलेल्या सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अलर्ट जारी करीत आरोपीला शोधण्यासाठी आठ पथके तयार केली. ही पथके फरार अल्पवयीन मारेकऱ्याच्या मागावर होती. पथकाला रात्री ११ च्या सुमारास तो गंगाबाई घाटाकडून जाताना दिसल्याचा सुगावा मिळाला. गंगाबाई घाट परिसरात मारेकऱ्याची बहिण राहते. त्यामुळे तो तिथे आहे, का हे तपासण्यासाठी पोलिसांनी घाट परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यात त्याला कोणीतही घाटाजवळ सोडल्याचे दिसले. तिथून तो नेमका कुठे पळाला याचा तपास करत असताना मारेकरी बहिणीच्या घरून कपिलनगरातील एका परिचिताकडे गेल्याची माहिती पथकाला मिळाली. तातडीने कपील नगर पोलीस हद्दीतील नारा रोड गाठत पथकाने त्याला ताब्यात घेतले.
शाळेचा परिसर बनला मूक साक्षिदार
ज्या संत अँथोनी शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी हत्याकांडाला बळी पडली त्या शाळेचा परिसर शनिवारी सुन्न झाला होता. इयय्ता दहावीत शिकत असलेल्या मुलीसोबत ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी तिची शाळेत सराव परिक्षा होती. सकाळच्या सत्रात झालेले दोन पेपर देऊन ती घरीजाण्यासाठी शाळेतून बाहेर पडली. ती चार पावले पुढे आली आणि तिची वाट पहात उभ्या अल्पवयीन मारेकऱ्याने डाव साधला. तिच्या छातीत सुरा खुपसून पळाला. ज्या शाळेत ती लहानाची मोठी तो शाळेचा परिसर मात्र तिच्या हत्याकांडाचा मुकसाक्षिदार बनला. परिचारिका बनत रुग्ण सेवेचा ध्यास घेतलेल्या या शाळरी मुलीच्या स्वप्नांची माती झाली. शोकाकूल वातावरणात नातेवाईकांनी जरिपटका येथील ख्रिश्चन दफनघाटावर तिला मुठमाती देताना साश्रू नयनांनी निरोप दिला.
निर्भयाचा धर्तीवर चालणार का खटला
नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडातला आरोपी देखील अल्पवयीन होता. मात्र घटनेचे गांभीर्य पाहता न्यायालयाने अपवादात्मक बाब म्हणून हा खटला चालवला. त्यामुळे या धर्तीवर नागपुरातील शाळकरी मुलीचा भर दिवसा खून करणाऱ्याचा खटला चालणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे. शाळकरी मुलीच्या हत्याकांडातील आरोपी हा १७ वर्षे ९ महिन्याचा आहे. येत्या २६ नोव्हेंबरला तो वयाची १८ वर्षे पूर्ण करणार आहे. सज्ञान होण्यात त्याला फक्त ३ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे निर्भयाच्या धर्तीवर हा खटला चालेल का हे आता पोलिसांच्या पुढील तपासावरून ठरेल. या प्रकरणात न्यायालय देखील काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.