यवतमाळ : वडील आणि मुलाचे नाते अतूट असते. पण, बदललेल्या कौटुंबिक व्याख्येत घरातील ज्येष्ठ मंडळी मुलं, सुनांना अडगळीची ठरू लागली. जगण्याच्या शेवटच्या टप्प्यात ज्याच्या खांद्यावर आधाराची अपेक्षा होती, त्याच खांद्याने दूर सारले. तोंडाच्या कर्करोगाने होरपळणारे मधु लालू जाधव (७१, रा. डेहनी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) यांच्या वाट्याला आलेला हा प्रवास मानवतेला अंतर्मुख करणारी ठरला.

व्याधीग्रस्त वडिलांना घरात न ठेवता मुलाने एसटीत बसवून वर्ध्याकडे रवाना केले. मात्र प्रवासादरम्यान असह्य वेदना झाल्याने मधु जाधव यवतमाळमध्ये उतरले. मात्र येथे त्यांच्या वाट्याला होरपळच आली. परिचयाचे कोणीच नसल्याने उपचाराच्या आशेऐवजी त्यांना येथील शहा हॉस्पिटलसमोरच्या ढकलठेल्याचा आसरा मिळाला. दोन रात्री त्यांनी तेथेच काढल्या. नशिबाची कठोर परीक्षा इतकी भयानक होती की त्यांच्या तोंडातील जखमेतून अळ्या पडत होत्या; सभोवती असह्य दुर्गंधी पसरली होती.

मधु जाधव यांच्याबद्दल माहिती मिळताच येथील नंददीप फाऊंडेशनचे संदीप शिंदे व सेवेकरी घटनास्थळी धावले. त्यांनी मधु जाधव यांना तातडीने वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या तोंडातील जखमा स्वच्छ करण्यात आल्या. पुढील उपचारांसाठी फाऊंडेशन सज्ज होत असतानाच, नियतीने मात्र वेगळाच निर्णय घेतला. २६ सप्टेंबर रोजी मधु जाधव यांची प्राणज्योत मालवली.

मुलाकडून नकार, गावकऱ्यांकडून आधार

जगण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मधु जाधव भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होते. मिळालेली भिक्षा ते आपल्या मुलाला नेऊन देत राहिले. परंतु शेवटच्या क्षणी त्या मुलानेच ‘मला काही देणेघेणे नाही’, असे म्हणत नाते तोडले. या वेदनादायी प्रसंगात गावकऱ्यांनी मात्र मानवतेचे कर्तव्य पार पाडले. उपचारासाठी त्यांनी आजोबांना आधार दिला. नंददीप फाऊंडेशनने त्यांच्या निधनाची माहिती मुलास कळवली. मात्र त्याने वडिलांच्या अंत्यविधीस येण्यास चक्क नकार दिला, आणि नंददीप फाउंडेशनने त्यांचे अंत्यसंस्कार करावे, असा सल्ला दिला. त्यांनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी फाऊंडेशनने स्वीकारली.

संस्थेचे सेवेकरी निशांत सायरे, कार्तिक भेंडे, स्वप्निल सावळे, कृष्णा मूळे तसेच गावकरी श्याम जाधव, शुभम जाधव, आशिष जाधव, ज्ञानेश्वर पवार, निजाम शेख, अतिक शेख यांनी मधु जाधव यांच्या मृतदेहावर रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. एकीकडे कुटुंबातील असंवेदनशीलता आणि दुसरीकडे समाजात अजूनही संवेदनशीलता जिवंत असल्याचे दर्शन मधु जाधव यांच्या निधनाने घडविले.