नागपूर : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ म्हणजेच विद्यापीठ शिक्षण मंचाच्या होऊ घातलेल्या चार दिवसीय अधिवेशनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणांच्या सदस्यांकडून पैसे मागितले जात असल्याची माहिती आहे. अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांसाठी पाच हजार तर सदस्यांसाठी तीन हजारांचा दर ठरवण्यात आल्याचे कळते.
रेशीमबाग येथील व्यास सभागृहात विद्यापीठ शिक्षण मंचाचे २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असे चार दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. दोन वर्षांआधी हे अधिवेशन बेंगळुरूला तर मागील वर्षी दिल्ली येथे झाले होते. सध्या नागपुरात शिक्षण मंचाची ताकद वाढल्याने यंदा हे अधिवेशन नागपुरात होणार आहे. या निवासी अधिवेशनामध्ये देशभरातील प्राध्यापक उपस्थित राहतात. त्याचा खर्च लाखोंच्या घरात असतो. त्यासाठी शिक्षण मंचाकडून विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून पैसे मागितले जात आहेत. काही प्राध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले की, शिक्षण मंचाने दरपत्रक ठरवून दिले असून पैशांसाठी मागणी केली जात आहे. अशाप्रकारे वसुली करणे गैर असल्याचा आरोपही काही प्राध्यापकांनी केला आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : तब्बल १ कोटी ११ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, ‘या’ तंबाखू तस्कराचे नाव चर्चेत
विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणांवर सध्या शिक्षण मंचाचे वर्चस्व आहे. बहुतांश अभ्यास मंडळावर शिक्षण मंचाचेच पदाधिकारी अध्यक्ष आणि सदस्य आहेत. त्यामुळे अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना पाच हजार रुपये तर सदस्यांना तीन हजार रुपये ठरवून देण्यात आले आहेत. एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमांसाठी प्राध्यापकांकडून पैसे मागण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने विद्यापीठ वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
तीन प्राध्यापकांचा सत्कार
शिक्षण मंचाच्या अधिवेशनामध्ये तीन प्राध्यापकांना दीड लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन ‘शिक्षा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समिती देशभरातून तीन प्राध्यापकांची निवड करणार आहे. अधिवेशनाच्या समारोपीय सोहळ्यात या शिक्षकांचा सत्कार होणार आहे.
हेही वाचा – Women Reservation : उमा भारतींना काँग्रेसचा पाठिंबा; नेमका मुद्दा काय? जाणून घ्या…
अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी लाखोंचा खर्च आहे हे खरे असले तरी कुठल्याही प्राध्यापकांकडून वसुली केली जात नाही. पैसे ही आमची अडचण नाही. शिक्षण मंचाचे कार्यकारिणीतील पदाधिकारी १७५ इतके असून त्यांनाच आम्ही केवळ पाच हजार रुपये देणगी ठरवून दिली आहे. त्यातही बळजबरी नाही. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठीही ही देणगी ऐच्छीकच ठेवण्यात आली आहे. यावरून कुणी आरोप करत असेल तर ते चुकीचे आहे. – प्रा. डॉ. सतीश चाफले, महामंत्री, शिक्षण मंच.