अमरावती : येथील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे (३८, रा. गुरूकृपा कॉलनी, वडाळी) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत काल रात्री आढळून आला होता. या प्रकरणात मृत आशा यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे फ्रेझरपुरा पोलिसांनी आशा यांचा पती आणि राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राहुल तायडे याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. राहुल यानेच दोन परिचयातील आरोपींना पत्नीच्या हत्येची सुपारी दिल्याची बाब समोर आली आहे.
दोन मारेकरी काल संध्याकाळी राहुल तायडे यांच्या घरी पोहोचले आणि त्यावेळी घरी एकट्या असलेल्या आशा यांचा गळा दाबून खून केला. विशेष म्हणजे, भाडोत्री मारेकऱ्यांचे काम सोपे करण्यासाठी, त्याच वेळी राहुल तायडे हा त्यांच्या ९ वर्षांच्या मुलीला बाहेर फिरायला घेऊन गेला होता आणि योजनेनुसार आशा यांची हत्या झाल्यानंतरच घरी परतला होता. राहुल तायडे यांचे गेल्या तीन-चार वर्षांपासून दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते आणि राहुल तायडे यांना त्या दुसऱ्या महिलेशी लग्न करायचे होते. या प्रकरणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत आणि सुमारे तीन-चार दिवसांपूर्वी हे प्रकरण फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यातही पोहोचले. जिथे अदखलपात्र प्रकरण दाखल करण्यात आले. दरम्यान, सुमारे २० दिवसांपूर्वी आशा यांचा अपघात झाला आणि त्या प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर असताना तिच्या घरी आराम करत होत्या. राहुल तायडे याने या संधीचा फायदा घेण्याचा विचार केला आणि आशा यांना मार्गातून हटवण्याची योजना बनवली. त्यानंतर त्यांनी या कामासाठी त्यांच्या ओळखीच्या दोन लोकांना सुपारी दिली आणि आशा यांना ठार मारण्यास सांगितले.
काल सायंकाळी राहुल तायडे यांचा मुलगा शाळेत असताना राहुल तायडे स्वतः त्याच्या मुलीला सोबत घेऊन तिला शिकवणीला सोडण्यासाठी निघून गेला. दरम्यान, राहुल तायडे यांच्या ओळखीच्या दोन्ही व्यक्तींनी तोंडावर रुमाल बांधून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि आशा यांची गळा दाबून हत्या केली.त्याचवेळी आशा यांचा मुलगा घरी पोहचला. घरातून तोंडावर रुमाल बांधलेले दोन पुरुष बाहेर पडताना पाहून तो ओरडू लागला आणि वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूकडे धावत गेला. त्याचा आवाज ऐकून, भाडेकरू कुटुंबातील सदस्य खाली आले. पण तोपर्यंत मारेकरी तिथून पळून गेले होते. फ्रेझरपुरा पोलिसांनी राहुल तायडेची कसून चौकशी केली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.