संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा : दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बुलढाणा मतदारसंघातील प्रचाराने दुसऱ्या टप्प्यात जोर धरला आहे. राजकारण व निवडणुकीय तंत्राचा अनुभव आणि पूरक बाबीमुळे महायुती सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मात्र आघाडीतील बिघाडी बव्हंशी दूर झाल्याने आघाडीचा प्रचार सुरळीत झाला असतानाच अनपेक्षितरित्या अपक्षांनी वातावरण निर्मिती केली आहे. यामुळे प्रारंभी दुरंगी वाटणारी लढत तिरंगी वळणावर असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांमुळे होणारे मतविभाजन निकालात निर्णायक ठरणार आहे.

आपल्या कारकिर्दीत साधा शिवसैनिक ते दिल्ली (‘व्हाया’ मुंबई) असा युतीचे प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सलग तीस वर्षांपासून आमदार व खासदार असल्याने राजकारण व निवडणुकीचे तंत्र अवगत असणे ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. दोनदा राजेंद्र शिंगणे सारख्या लोकनेत्याला पराभूत करण्याची किमया त्यांनी केली आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असतानाच आता कट्टर प्रतिस्पर्धी शिंगणेच सोबत असल्याने त्यांचे बळ आणखी वाढले. याशिवाय सहाही मतदारसंघात युतीचेच आमदार असणे ही त्यांची जमेची बाजू आहे. पंधरा वर्षातील विकासकामे, १५ घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे जाळे, प्रचाराचे नियोजन या जोरावर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

आणखी वाचा-वादळवारं सुटलं गो… सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त

दुसरीकडे आघाडीचे नरेंद्र खेडेकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, वंचितचे वसंत मगर, वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हे प्रथमच लोकसभेच्या मोठया आखाड्यात उतरले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जुळवाजुळव व नियोजन करण्यात कठीण गेले . दुसऱ्या टप्यात आघाडीचे खेडेकर, तुपकर व शेळके या अपक्षांनी सुधारणा करीत प्रचाराला गती दिली.या तुलनेत तुपकर यांच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात सुधारणा झाल्याचे दिसून येते. सिंदखेडराजा मध्ये प्रचाराचा नारळ फोडल्यावर झालेल्या रॅली व मेळाव्यात मोठी गर्दी झाली.

अजितदादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांचा गड असलेल्या सिंदखेडराजा मध्ये झालेली गर्दी विरोधकांना चकित करणारी ठरली. स्वबळावर लढत असतानाही त्यांच्या सभा व छोटेखानी ‘रोड शो’ ना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. गेले तिथे होणारी निवडणूक वर्गणी, एक नोट-एक वोट चे आवाहन, २२ वर्षाच्या शेतकरी चळवळीतील आंदोलने व आता मतांच्या रूपाने परतफेड करण्याचे आवाहन हे त्यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य आहे. पाच लाखांच्या आसपास असलेले शेतकरी, युवावर्ग यावर त्यांचा रोख आहे. खासदार जाधव यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. घाटावरील चार विधानसभा च्या तुलनेत घाटाखालील २ मतदारसंघात मात्र त्यांना तितका प्रतिसाद नाहीये. ठाकरे सेनेचे खेडेकरांच्या प्रचारात ताळमेळ व मित्र पक्षांत समन्वय नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात प्रभाव असलेली काँग्रेस अजूनही ताकदीने कामाला भिडली नसल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…

वंचित चा प्रचार धीम्या गतीने सुरू असून केवळ गठ्ठा मतांवर त्यांचे लक्ष आहे. एका नाराज गटाने प्रचारातून अंग काढून घेतल्याने त्यांची दमछाक होत आहे. यामुळे ते मागील लढतीतील वंचितच्या १ लाख ७२ हजार मतांच्या चमत्काराची पुनरावृत्ती करू शकणार नाही असा जाणकारांचा अंदाज आहे. रिंगणातील दुसरे अपक्ष संदीप शेळकेंनी, शाहू परिवार चे पाठबळ व स्वबळावर प्रचारात रंगत आणली आहे. परिवर्तन व विकासाच्या मुद्यावर त्यांनी भाषणाचा रोख ठेवला असून खासदाराविरुद्ध त्यांच्या भाषणाचा रोख आहे. दोन्ही सेनेकडे असलेले गठ्ठा मतदान आहे. मात्र बहुसंख्याक सकल मराठा समाजाच्या मतांचे विभाजन अटळ आहे. यामुळे दोन अपक्ष, वंचित किती मतदान घेते हा घटक देखील निकालात निर्णायक ठरणार आहे.