चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील ६ हजार ८५३ बोगस मतदार नोंदणीप्रकरणी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून चौकशी होत नसल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने होत आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवाल अर्थात ‘एफआयआर’मध्ये सात भ्रमणध्वनी क्रमांकांची नोंद आहे. याच क्रमांकांवरून बोगस मतदार नोंदणी झाल्याचा संशय आहे. हे सर्व भ्रमणध्वनी क्रमांक गडचांदूर येथील असावेत, असाही संशय आहे. मात्र पोलिसांचा तपास समोर सरकत नसल्याने संशय बळावत चालला आहे.
राजुरा मतदार संघातील पराभूत उमेदवार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी विधानसभा निकालाच्या दिवसापासून मतचोरीचा आरोप केला आहे. आता तर शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार, पराभूत उमेदवार ॲड. वामनराव चटप यांनीही किमान अकरा हजार बोगस मतदारांची नोंदणी राजुरा क्षेत्रात झाली, असा आरोप केला आहे. या बोगस मतदार नाेंदणी प्रकरणात राजुराचे तत्कालीन तहसीलदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलीस तपास समोर सरकत नसल्याने सर्वांचाच संशय बळावत चालला आहे.
‘एफआयआर’मध्ये एकूण सात मोबाईल क्रमांकांची नोंद आहे. या सातही क्रमांकांवरून बोगस मतदार नोंदणी झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच तक्रारीत या क्रमांकांचा समावेश आहे. हे क्रमांक गडचांदूर येथील असल्याचा संशय आहे. याच क्रमांकांवरून मतदारांची नोंदणी झाली. त्यांचा ‘ओटीपी’ दिला गेला, असेही बोलले जात आहे. मात्र, पोलीस अद्यापही हे सात भ्रमणध्वनी क्रमांक कुणी वापरले, त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. ‘एफआयआर’मध्ये सात भ्रमणध्वनी क्रमांकांची नोंद असली तरी ती संख्या जास्त असू शकते, अशीही चर्चा आहे.
भ्रमणध्वनी क्रमांक दिले होते तर पोलिसांनी त्याचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. मात्र, पोलिसांना यात अपयश आले आहे. पोलिसांचा राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु निवडणूक आयोगही प्रतिसाद देत नसल्यामुळे राजुरा बोगस मतदार नोंदणी प्रकरणातील संशय बळावत चालला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे यांच्याकडून पाठपुरावा सुरू असला तरी त्यांनाही जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून ठोस माहिती किंवा उत्तर मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.