वर्धा : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्री आर्वीत हजर असतांनाच एक मोठी दुर्घटना घडली. मात्र मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आटोपून ते हेलिपॅड कडे रवाना होत असतांनाच इकडे धावपळ सूरू झाली होती.तळेगाव रस्त्यावर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता. तर याच तळेगाव टी पॉईंट ईथे आगीचे लोळ उसळले होते. ईथे भिंदर परिवाराची क्रिकेट अकादमी आहे. त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट मुळे आग भडकली होती. पण प्रथम परिसरातील गावकरी जमा होत त्यांनी आपल्या परीने आग विझविण्याचा प्रयत्न सूरू केला. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांना निरोप देत परत येत असलेले पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर व आमदार सुमित वानखेडे हे आग लागल्याचे कळताच घटनास्थळी पोहचले. त्यांनी सर्व ती माहिती घेत अग्निशमन यंत्रनेस सूचित केले. त्वरित तिवसा, वर्धा, पुलगाव व आर्वी येथील अग्निशमन दल गाड्यांसाह दाखल झाले.

या यंत्रनेने शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. अकादमीच्या वरच्या मजल्यास आग लागली होती. धुराचे लोट आकाशात उंचच उंच दिसत होते. मात्र योग्य ती हालचाल झाल्याने सर्व सुखरूप राहले.अकादमीचे संचालक रोमी भिंदर हे म्हणाले की खरंच खूप वाचलो. पालकमंत्री डॉ. भोयर यांची तत्परता कामात आली. तसेच आमदार सुमित वानखेडे यांचे प्रयत्न कामात आले. शॉर्ट सर्किट कसे झाले हे सांगता येणार नाही. इमारतीच्या निवासी भागात आग लागली होती. सुदैवाने यावेळी कोणीच तिथे हजर नव्हते. गावकरी प्रथम सतर्क झाल्याने वेळेवर मदत पोहचली, असे भिंदर लोकसत्ता सोबत बोलतांना म्हणाले.

ही क्रिकेट अकादमी नव्या क्रिकेट खेळाडूंचे प्रशिक्षण कार्य करते. ६ फेब्रुवारीस या ठिकाणी नागपूर सामन्यासाठी आलेले इंग्लंडचे कर्णधार जोस बटलर यांनी या ठिकाणी भेट दिली होती. राजस्थान रॉयल हाय परफॉर्मन्स सेंटर म्हणून या केंद्राची नोंद आहे. कर्णधार जोस यांनी त्यावेळी उपस्थित सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व स्टाफची संवाद साधला होता. येथील जागतिक दर्जाची प्रशिक्षण व्यवस्था पाऊण त्यांनी आनंद व्यक्त केला होता. तसेच खेळाडूंसोबत क्रिकेटचा सराव पण केला होता. आज आग लागलेल्या घटनेने हे क्रिकेट कोचिंग सेंटर चांगलेच चर्चेत आले आहे.