अमरावती : राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. राजकीय वर्तूळात वेगवान घडामोडी घडत आहेत. चर्चेतील नावे मागे बाजूला पडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे विदर्भातील नेते संजय खोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या अमरावतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला एकच जागा आली असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधान परिषदेवर कुणाला पाठविणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती, पण अखेर संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली.

तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत संघटनात्मक बांधणीचे कौशल्य, अनेकवेळा पडद्यामागे राहून तर कधी थेट मैदानात उतरून विरोधकांशी दोन होत करणारे नेते म्हणून संजय खोडके यांची ओळख आहे.अनेक मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) ते पक्ष संघटनात्मक बांधणीत योगदान देणारे संजय खोडके यांची राजकीय कारकीर्द मात्र खाचखळग्यांची राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असताना पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. मार्च २०१४ मध्‍ये लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला त्यांनी उघड विरोध केला होता. त्यामुळे त्‍यांची पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली होती. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात गेले. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ च्या निवडणुकीत संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या अमरावती विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्या, हे बऱ्याच वर्षांनंतर खोडके दाम्पत्याला मिळालेले यश होते. याआधी बडनेरा विधानसभा मतदार संघातून त्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आल्‍या होत्‍या. सुलभा खोडके यांना पराभूत करून रवी राणा हे निवडून आले होते. तेव्‍हापासून राणा आणि खोडके यांच्‍यात अनेकवेळा संघर्ष झाला. संजय खोडके हे सत्तेत सामील झाले. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत सुलभा खोडके यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी मिळाली आणि त्या निवडूनही आल्या.