नागपूर : शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननावरे यांनी मकालू शिखर गाठत नागपूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मकालू शिखर सर करणारे ते पहिले गिर्यारोहक तर, चौथे ‘एव्हरेस्टवीर’ ठरले आहेत, हे विशेष. शिवाजी ननावरे हे राहणार मुळचे सोलापुरचे रहिवासी आहेत. तर नागपूर पोलीस दलात गुन्हे शाखेत ते कार्यरत आहेत. त्यांनी ३० मे रोजी सकाळी ८.३० वाजता जगातील पाचव्या उंच ठिकाणी माऊंट मकालू येथे भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकवला.

माउंट मकालू हे जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हिमालय पर्वतातील हे शिखर ८४८५ मीटर उंचीचे असून, नेपाळ-चीन सीमेवर स्थित आहे. हे शिखर चढाईस अत्यंत खडतर आहे. खडकाळ भाग जास्त आहे. त्यामुळे, ७,००० मीटर उंचीनंतर चढाईस खुपच त्रास होतो. म्हणूनच बरेच गिर्यारोहक याकडे पाठ फिरवतात. यावर्षी ३६ गिर्यारोहकांना चढाईसाठी परवानगी देण्यात आली होती.

हेही वाचा >>>भंडारा : अनोखे आंदोलन; मोर्चात चक्क म्हशी…

परंतू, त्यापैकी फक्त ९ गिर्यारोहकांना शिखरावर पोहचता आले. त्यामध्ये भारतातून शिवाजी ननावरे यशस्वी ठरले. महाराष्ट्र पोलीस दलातून यापूर्वी कोणीही हे शिखर सर केले नसल्याने महाराष्ट्र पोलिसांची प्रतीमा देशभरात उंचावली आहे.

वरिष्ठांच्या सहकार्यातूनच मिळाले यश

शिवाजी ननावरे यांना वर्ष २०१८ साली पोलीस महासंचालक पदक, २०१९ साली केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षापदक तसेच, खडतर सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या कामगिरीसाठी ननावरे यांना नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहआयुक्त अश्वती दोर्जे, उपायुक्त निमित गोयल व मुख्यालयाच्या उपायुक्त अश्विनी पाटील यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. या वर्षी सततच्या बदलत्या हवामानामुळे हे शिखर सर करण्यासाठी ५५ दिवसांचा कालावधी लागला. ‘वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळेच मी ही कामगिरी पार पाडू शकलो,’ असे मनोगत शिवाजी ननावरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ; ‘या’ रेल्वे रद्द, कामकाज प्रभावित…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तयारी ‘मनास्लू’ शिखराची

शिवाजी हे गडचिरोलीमध्ये सी-६० कमांडोमध्ये कार्यरत असताना शिखर चढण्याबाबत त्यांनी विचार केला. २०२३ मध्ये शिवाजी यांनी माऊंट एवरेस्ट शिखर सर केले होते तर यावर्षी मनालू शिखर सर केले. मात्र, येत्या सप्टेंबर महिन्यात जगातील आठव्या क्रमांकाचे मनास्लू शिखर सर करण्याची तयारी शिवाजी यांनी केली आहे. शेतकरीपूत्र असलेल्या शिवाजी यांच्या कर्तृत्वाची दखल आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दल किंवा गृहमंत्रालयाने घेतली नाही. साहसी खेळात मोडणाऱ्या प्रकारात शिवाजी यांनी पोलीस दलाचे नाव उंचविणारी कामगिरी केली असली तरी त्यांची कामगिरी दुर्लक्षित ठरली आहे. शासनाने योग्य दखल घेऊन एक टप्पा पदोन्नती दिल्यास अन्य अधिकाऱ्यांनासुद्धा साहसी खेळाबाबत प्रोत्साहन मिळेल.