कामकाजावर परिणाम होत असल्याचा दावा
चंद्रशेखर बोबडे, नागपूर</strong>
वजन, मापे व तत्सम बाबींची तपासणी करण्यासाठी उठसूठ दौऱ्यावर जाणाऱ्या निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांमुळे विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर बंधने घातली आहेत. तसे आदेशही मंगळवारी जारी करण्यात आले आहेत.
वैधमापन शास्त्र विभाग हा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येतो. व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील वजन, मापांची तपासणी, पडताळणी, फे रपडताळणीचे काम या विभागाच्या निरीक्षकांकडे असते. त्यांना दरवर्षी किती वजन मापांची तपासणी केली, किती व्यापाऱ्यांवर कारवाई केली याबाबतचे उद्दिष्ट दिले जाते. त्याच्या पूर्ततेचे बंधनही घालण्यात येते. त्यामुळे निरीक्षक व तत्सम अधिकारी उद्दिष्टपूर्तीला प्राधान्य देत वजन, मापांच्या तपासणीसाठी त्यांच्या क्षेत्रातील भागात दौरे करतात. अनेकवेळा तपासणीच्या नावाने अधिकारी कार्यालयीन कामकाजाकडेही दुर्लक्ष करतात. मुळातच या विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे.
त्यात निरीक्षकांच्या वाढत्या दौऱ्यामुळे मुख्यालयांना वेळोवेैळी लागणारी जिल्हा, विभागस्तळावरील माहिती वेळेत देणे अवघड होते, असे आढळून आले. त्यामुळे या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरीक्षकांच्या दौऱ्यांमुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाला कळवले. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने निरीक्षकांच्या दौऱ्यांवर बंधने घातली आहेत.
आता दौऱ्यावर जायचे असेल तर त्याची सविस्तर माहिती, कोठे जाणार ते कार्यक्षेत्र निरीक्षकांना विभागीय व जिल्हा सहायक नियंत्रकांना एक दिवसा आधी द्यावी लागेल.
दौरा आटोपल्यावर त्याचा सविस्तर अहवाल दुसऱ्या दिवशी सादर करावा लागेल. विविध आस्थापनांच्या भेटीसाठी उपनियंत्रक,सहायक नियंत्रक जात असेल तर त्यांची कार्यालयीन नोंद ठेवणे व संबंधित अधिकाऱ्याची त्यावर स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारच्या या आदेशावर निरीक्षक, सहायक निरीक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. वजन मापांची तपासणी करणे हा कामकाजाचाच एक भाग आहे. त्यासाठी दौरे करणे आवश्यक आहे. त्यावरच बंधने आणली तर दिलेले उद्दिष्टे कशी पूर्ण करणार, असा सवाल या कार्यालयातील एका निरीक्षकाने केला.