नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) बळकट करण्याचे आश्वासन दिले खरे परंतु, सातत्याने रखडत चाललेले निकाल, परीक्षा, निवड प्रक्रिया आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी चिंताग्रस्त झाला आहे.
आयोगाकडून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यावर एक ते दोन महिने निकाल दिला जात नसल्याने ‘एमपीएससी’ला नेमके झाले तरी काय?, असाच प्रश्न आता परीक्षार्थी उमेदवार करीत आहेत. या विरोधात आता माजी मंत्री बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न एका आठवड्यात मार्गे न लागण्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी खालील प्रमाणे काही मागण्या आयोगासमोर ठेवल्या आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक परीक्षा घेऊन गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा नोकरी देण्याचे पवित्र काम करत आहे; पण महोदय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर फिरत असताना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी खालील प्रश्न घेऊन मला वारंवार भेटत आहेत. संबंधित विद्यार्थी खूप नैराश्येत आहेत. आत्महत्या करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे आज मला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे खालील प्रलंबित विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत, अन्यथा मी स्वतः आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसेल.
१) संयुक्त गट व पूर्व परीक्षा २०२४ निकाल जाहीर करणे….
२) गट क लिपिक (२०२३) ३९३ जागांचा समावेश निकालात करणे…
३) गट क लिपिक (२०२३) च्या निकालात खुला प्रवर्गातून पात्र झालेल्या मुलींची निवड खुल्या
प्रवर्गातून न करता फक्त महिला प्रवर्गातून केलेली आहे, याबाबत आयोगाने स्पष्टीकरण द्यावे.
४) राज्यसेवा २०२३ तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करणे.
५) क्लर्क २०२३ च्या निकालाची ऑपटींग आऊट पुन्हा उपलब्ध करून देणे.
६) डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करणे.
७) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४च्या निकालात ईडब्ल्यूएस या एकाच प्रवर्गाचा गुणोत्तर इतर प्रवर्ग पेक्षा जास्त घेतलेला आहे, तर त्याबाबतीत खुलासा करण्यात यावा.
८) राज्यसेवा २०२४ परीक्षेबद्दल उद्भवलेल्या अनेक तांत्रिक अडचणींवर आत्ताच मार्ग काढणे व परीक्षा कायदेशीर प्रक्रियेत अडकू देऊ नये.
मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते
राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अनियमित आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, आयोगाच्या लालफिती कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम बनवावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. यावर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला सक्षम करण्याचे आश्वासन दिले.
दुर्दैवाने ‘एमपीएससी’चे वेळापत्रक तयार केल्यानंतरही ‘यूपीएससी’प्रमाणे त्याची अंमलबजावणी होत नाही. यात सुधार करण्यावर भर दिला जाईल. तसेच भविष्यात सरळसेवा भरती परीक्षाही ‘एमपीएससी’कडून घेतल्या जाणार असल्याने मनुष्यबळ पुरवठा व सदस्यांची भरती केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. परंतु, मागे पाठ पुढे सपाट याप्रमाणे आयोगाच्या परीक्षा, निकाल, मुलाखती आणि निवड प्रक्रिया ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहे.