मागील महिनाभरापासून देसाईगंज वनविभाग जंगल परिसरात मुक्कामी असलेल्या रानटी हत्तीच्या कळपातील हत्तीने वनविभागाच्या वाहनचालकाला पायाखाली तुडवून ठार केल्याची घटना डोंगरगाव (हलबी) जंगल परिसरात घडली. सुधाकर बाबुराव आत्राम(४५) असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

रानटी हत्तीच्या कळपाने देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी परिसरात उच्छाद मांडला आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास डोंगरगाव परिसरातील शेतात प्रवेश करून या कळपाने नासधूस सुरू केली होती. यावेळी हत्तींच्या कळपाला पळवून लावण्यासाठी वनकर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. दरम्यान, कळपातील एका हत्तीने वनकर्मचाऱ्यांच्या दिशेने धाव घेत हल्ला केला. यावेळी त्याठिकाणी उपस्थित सहाय्यक वनसंरक्षक यांचे वाहनचालक सुधाकर आत्राम हे त्या हत्तीच्या तावडीत सापडले. संतप्त हत्तीने त्यांना पायाखाली तुडवून ठार केले. माहिती कळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. सुधाकर आत्राम मार्च महिन्यातच चंद्रपूर येथून बदली होऊन देसाईगंज येथे रुजू झाले होते. त्यांच्या मृत्युमुळे वनविभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> ”बच्‍चू कडूंनाच आवर घालण्‍याची गरज”; आमदार रवी राणा म्‍हणतात, ”ते ब्‍लॅकमेल करतात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांमध्ये दहशत

रानटी हत्तींच्या कळपाने देसाईगंज व आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीपिकाची नासधूस केली आहे. या भागातील जवळपास शेकडो हेक्टरवरील धनापिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात अधूनमधून हे हत्ती हल्ला करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे तात्काळ या हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.