वर्धा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तासाभरापूर्वी भेटून आलेले माजी आमदार अमर काळे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वप्रथम ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबत बोलताना, “मी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत ठाम असून माझी भूमिका मांडली आहे. सर्वच बाबी उघड करता येत नाही,” असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर? सस्पेन्स कायम; तेली समाजापाठोपाठ कुणबी समाजाचाही इशारा
वर्धा लोकसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कदाचित सर्वात शेवटी जाहीर होण्याची चिन्हे आहेत. शरद पवार हे वर्धेची जागा सोडायला तयार नाहीत. त्यांनी अमर काळे यांना त्यांच्या पक्षातर्फे लढण्याची ‘ऑफर’ दिली आहे. मात्र, हा तिढा सोडवायचा कसा, असा पेच अमर काळे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. याच संदर्भात अमर काळे यांनी नाना पटोले यांची भेट घेतली. त्यांच्यावतीने बोलणाऱ्या एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना काळेंसाठी साकडे घातले. राष्ट्रवादीकडून तिकीट मागून घ्या किंवा अमरला त्यांच्यातर्फे लढू द्या, मी विजयाचे पेढे स्वतः घेऊन तुमच्याकडे येईल, अशी खात्री या नेत्याने चेन्निथला यांना दिली. ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबत बोलताना, “सध्या नाव छापू नका,” असे हा नेता म्हणाला. दुसरी बाब म्हणजे, अमर काळे यांना काँग्रेस सोडली हा धब्बा नको. त्यासाठी अत्यंत अपवाद म्हणून उभय काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी फक्त काळे यांची एकट्याची उमेदवारी जाहीर करावी. त्यास महत्त्व द्यावे, त्यानंतरच ठरेल, असे या वाटाघाटीत असलेल्या नागपूरच्या एका नेत्याने नमूद केले.