scorecardresearch

‘भारत जोडो’ महाराष्ट्रात यशस्वी, पण ‘नेते जोडो’त काँग्रेस अपयशी; माजी मंत्री लवकरच भाजपमध्ये जाणार

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी आशा असतानाच जिल्ह्यात ‘काँग्रेस छोडो’चा सूर उमटत आहे.

‘भारत जोडो’ महाराष्ट्रात यशस्वी, पण ‘नेते जोडो’त काँग्रेस अपयशी; माजी मंत्री लवकरच भाजपमध्ये जाणार
‘भारत जोडो’ महाराष्ट्रात यशस्वी, पण 'नेते जोडो'त काँग्रेस अपयशी; माजी मंत्री लवकरच भाजपमध्ये जाणार

वाशीम : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, ही यात्रा जिल्ह्यातून जात नाही तोच काँग्रेसला जोरदार धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे एकेकाळचे मातब्बर नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी रिसोड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी आशा असतानाच जिल्ह्यात ‘काँग्रेस छोडो’चा सूर उमटत आहे. काँग्रेसमधील अनेक निष्ठावान कार्यकर्ते भारत जोडो यात्रेपासूनही दूरच होते. एकेकाळी जिल्हाभर विस्तारलेली काँग्रेस आजमितीस नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित झनक यांच्या ‘रिसोड-मालेगाव प्रेमा’मुळे दोनच तालुक्यात तग धरून आहे. भारत जोडो यात्रेत आ. अमित झनक यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दूर ठेवल्याची चर्चा होती. यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.

हेही वाचा: माझा फोन उचलत का नाही, असे विचारत एकतर्फी प्रेमातून गुंडाचा तरुणीवर…

…तर जिल्ह्यात काँग्रेस नावापुरतीच शिल्लक राहणार

देशमुख यांची जिल्ह्यावर मोठी पकड आहे. त्यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यांच्या गटाचे जिल्हा प्ररिषदेत ६ सदस्य, पंचायत समित्यांमध्ये २२ सदस्य आहेत. ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री, आदी संस्थांवरही देशमुख यांची मजबूत पकड आहे. पक्षसंघटनेत त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. यामुळे देशमुख यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर जिल्ह्यात काँग्रेस केवळ नावपुरतीच शिल्लक राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: ‘हॅलो, तुमच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू आहे…’; खंडणीसाठी धवनकर कुलगुरू कक्षातून करायचे संपर्क

‘भारत जोडो’ऐवजी ‘काँग्रेस जोडो’ची गरज

खा. राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला बळ देण्याचे कार्य करीत आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती बघता काँग्रेसपासून दुरावलेले नेते काँग्रेसमध्ये परत सहभागी करून ‘काँग्रेस जोडो’ अभियान राबवण्याची गरज आहे. देशमुख यांच्यावर पक्षसंघटनेत वारंवार अन्याय झाल्याची भावना असून जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करावी. त्यांचा भाजप प्रवेश रोखल्यास त्यांच्या माध्यमातून पक्षाला नवचैतन्य मिळेल, अशी आशा काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 10:39 IST

संबंधित बातम्या