अकोला : अवैध सावकारी करणे चार जणांना चांगलेच भावले असून या दोन वेगवेगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावकारी परवाना नसताना अवैधरित्या हा व्यवसाय चालवला. या प्रकरणी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने छापा टाकून कारवाई केली.
अवैध सावकारी प्रकरणी दिगांबर व संजय गोरले यांनी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. यामध्ये रमेश कोल्हे, सुरेश कोल्हे व भगवान काटोले यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पंचासमक्ष व पोलीस बंदोबस्तात २७ मार्च रोजी छापा टाकण्यात आला होता. त्यामध्ये बक्षीसपत्र एक, खरेदी खत छायाप्रती तीन, इसार पावती चार, धनादेश १३, पासबुक सहा, मुद्रांक एक, सातबारा नमुना पाच असे दस्तऐवज जप्त केले. सहाय्यक निबंधक (प्रशासन) अभयकुमार कटके यांनी चौकशी करून व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचा अहवाल दिला. त्यावरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम ३९ अन्वये खदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात सुरेश वाघमारे यांच्या तक्रारीनुसार धनराज जामोदे याच्याकडे छापा टाकण्यात आला. यामध्ये बक्षीसपत्र दोन, खरेदीखत ३४, इसारपावती तीन, उसनवारपावती एक, हस्तांतरणपत्र एक, मुद्रांक १३६, धनादेश एक व पासबुक आठ दस्तऐवज जप्त केले. तेल्हारा येथे आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास तक्रार आवश्यक पुराव्यासह उपनिबंधक सहाय्यक सहकारी संस्था कार्यालयात दाखल करावी. नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे यांनी केले.
१५१ एकर शेतजमीन परत
अवैध सावकारीमध्ये बळकावलेली एकूण १५१ एकर शेतजमीन व ४७७६ चौ. फूट जागा, एक राहता फ्लॅट तसेच १६३.५० चौ. मी. जागा संबंधिताना परत केली. आतापर्यंत ४१६ प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहेत. त्यापैकी सावकारी व्यवहार सिद्ध झालेल्या प्रकरणी ५८ प्रकरणामध्ये फौजदारी गुन्ह्याची नोंद झाली असून १११ प्रकरणी कलम-१६ व १८ (१) अन्वये चौकशी सुरू आहे.