बुलढाणा : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले आहे. हे तांडव कायम असल्याने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आले असून नद्या दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम आणि ४१ लघु प्रकल्प तुंडूंब भरल्याने नदी पात्रात मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे नद्यांतील पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.
या पार्श्वभूमीवर गावाजवळून वाहणाऱ्या जीवनदायीनी नद्या धोकादायक ठरू लागल्या आहेत. याचा भीषण प्रत्यय नांदुरा व मलकापूर तालुक्यांत आज, रविवारी संध्याकाळी आला. या तालुक्यांतील दोन स्वतंत्र घटनांत चार जण दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत वाहून गेले. यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हाती लागला, तर इतर तिघांचा स्थानिक शोध बचाव पथक, पोलीस यंत्रणा आणि गावकरी युद्धपातळीवर शोध घेत आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत तिघांचा थांगपत्ता लागला नव्हता.
या घटनांचा विस्तृत तपशील प्राप्त झाला नसला तरी संबंधित तहसील कार्यलये आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या दोन्ही घटनांना दुजोरा दिला आहे.नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीत आज दुपारी करण भुमरे (१८) आणि वैभव फुके (१९) बुडाले. ते पोहण्यासाठी नदीत गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा वेग जास्त असल्याने ते वाहून गेले. स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ त्वरित घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. गावकरी व प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.
दुसरी दुर्घटना आज मलकापूर तालुक्यात घडली. शिवणी मार्गावरील नींबोळी गावानजीकच्या केसोबा मंदिर परिसरातील व्याघ्र नदीत पोहण्यासाठी सोहम वासुदेव सोनोने (१६, रा. दसरखेड) आणि शुभम राजू दवंगे (१४, रा. दसरखेड) गेले होते. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले. याची माहिती कळताच शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख विजय साठे यांनी गावकऱ्यांसह नदीकडे धाव घेतली. शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह हाती लागला. सोहमचा शोध सुरू आहे.