अमरावती : जिल्‍ह्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्‍या स्‍थापनेची घोषणा यंदाच्‍या अर्थसंकल्‍पामध्‍ये करण्‍यात आली. विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी पंधरा दिवसांच्‍या आत तज्‍ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, पण या घोषणेला चार महिन्‍यांचा कालावधी उलटूनदेखील अद्यापपर्यंत तज्‍ज्ञांची समिती स्‍थापन न केल्‍याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाचे माजी अध्‍यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले असून यासंदर्भात त्‍यांनी उपमुख्‍यमंत्री, तसेच उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना चौथे स्‍मरणपत्र पाठविले आहे.

हेही वाचा – ‘एक सही संतापाची’ मनसेचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी अशासकीय तज्‍ज्ञ समिती स्‍थापन करावी, यासाठी आम्‍ही सातत्याने गेली अनेक वर्षे शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. संबंधित अशासकीय तज्‍ज्ञ समितीची पंधरा दिवसांच्या आत स्थापनेची घोषणादेखील आपण केली होती. तज्‍ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्याची शासनाने तिसरी घोषणा करूनही सुमारे ४ महिने होत झाले असले, तरी संबंधित शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही, याकडे आपले पुन्हा लक्ष वेधीत आहोत. ही समिती आम्ही विनंती केलेल्या संस्थात्मक सहभागासह नेमली जावी, याचे पुन्‍हा स्मरणही करून देत आहोत, असे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटले आहे.