लोकसत्ता टीम

वाशीम : महाराज असल्याचा बनाव करून जादूटोण्याने भस्माच्या डबीतून दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष देत एका व्यक्तीची ८ लाख रुपयाने फसवणूक झाल्याचा प्रकार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून यामध्ये राज्य स्तरीय टोळीचा सहभाग असल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सचिन श्रीरंग देशमुख जिल्हा सातारा यांना आरोपी युसूफ खान जिल्हा बुलढाणा व इतर ७ ते ८ आरोपीनी संगनमत करून १५ दिवसापूर्वी वाशीम रिसोड मार्गांवरील एका खेड्याच्या शिवारात शेडमध्ये महाराजांच्या वेश्यात जादू टोणा करून पैश्याचा पाऊस पाडल्याचे भासविले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान पातूर येथील बस स्थानक जवळ भस्माची डब्बी घेण्यासाठी प्रवृत्त करून ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर मेडशी ते डोंगरकिन्ही मार्गावर पोलिसांच्या वेशात येऊन फिर्यादीच्या गाडीतील तायडे महाराज व शेख चांद यांना मारहाण करण्याचा बनाव करून त्यांना सोबत घेऊन गेले.

आणखी वाचा-छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक; घातपाताचा डाव उधळला, शस्त्रसाठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांचा पाठलाग करून मेडशी येथे आरोपीची गाडी अडविली. त्यावेळी आरोपी पळून जात असताना ग्रामस्थानी पोलिसांच्या मदतीने आरोपीस पकडले. मात्र काही आरोपी पसार झाले. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता १२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असून शोध घेत आहेत. अश्या प्रकारे जादू टोणा करून लोकांना लुटणारी ही राज्यस्तरीय टोळी असल्याचा संशय असून लवकरात सगळ्या आरोपीना अटक करू, अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांनी दिली.