अमरावती : चांदूर रेल्‍वे तालुक्‍यातील दोन ठगांनी चक्‍क आंतराष्‍ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नाव वापरून एका शेतकऱ्याची १५ लाख रुपयांनी फसवणूक केल्‍याची घटना चांदूर रेल्‍वे पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत उघडकीस आली आहे. अनिल बन्‍सीलाल राठोड (रा. चांदूर रेल्‍वे) आणि संदीप दादाराव राठोड (रा. पोहरा बंदी) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारकर्ते संजय ऊर्फ बाळकृष्ण ननोरे (रा. चांदुर रेल्वे) यांची चांदूर रेल्वे नजीक तुळजापूर शिवारात शेतजमीन आहे. त्‍यांच्‍या शेतात आवादा कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्‍प उभारला आहे. त्याचा मोबादला कंपनीकडून मिळणे बाकी होते. मोबदल्याच्‍या कारणावरून तक्रारदार संजय ननोरे आणि कंपनी यांच्‍यात काही वाद सुरू होता. त्या दरम्यान संजय ननोरे यांची आरोपी अनिल बन्सीलाल राठोड आणि संदीप दादाराव राठोड यांच्‍यासोबत भेट झाली. त्यांनी त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद, दिल्ली चे पदाधिकारी असल्याची करुन दिली. तसेच संजय ननोरे यांना कंपनीकडून मोबदल्याची रक्कम मिळवून देण्यासाठी कंपनी सोबत लढणे त्‍यांना शक्य होणार नाही, अशी खोटी बतावणी करून त्यांचे शेत राहुल महाजन नावाच्‍या व्यक्तीला ७ लाख रुपयांत विक्री करण्यास भाग पाडले.

हेही वाचा >>>प्रकाश आंबेडकर थेटच बोलले….“शिवसैनिकांच्‍या दृष्‍टीने एकनाथ शिंदेंचा पक्षच खरी शिवसेना…”

दरम्‍यान संबंधित कंपनीकडून संजय ननोरे यांच्‍या बँक खात्यात जमीनीच्या मोबदल्या पोटी २२ लाख रुपये आले असता अनील राठोड व संदीप राठोड यांनी कंपनी कडून एकूण ३३ लाख रुपये मिळवून देतो, त्यासाठी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद, दिल्ली चे अध्यक्ष यांना पैसे पाठवावे लागतात अशी खोटी बतावणी केली. आरोपींनी संजय ननोरे यांच्‍याकडून १५ लाख रुपये घेऊन त्‍यांची फसवणूक केली. आरोपींविरुध्द चांदूर रेल्वे पोलीस ठाण्‍यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार, राष्ट्रीय मानवाधिकार, राज्य मानवाधिकार आयोग यांचे नाव, बोधचिन्ह, खोटे ओळखपत्र, लेटरहेड याबाबींशी साधर्म्य ठेवून काही जण नागरीकांची फसवणूक करीत असल्याचे या प्रकरणावरुन दिसून आले आहे. नागरीकांनी अशा व्‍यक्‍तींवर विश्वास न ठेवता अशा प्रकारे कुणीही आपणास खोटी बतावणी करून धमकावणे किंवा एखादे प्रकरण मिटविण्याच्‍या नावावर खंडणी घेण्याचा प्रकार करीत असल्यास तसेच केला असल्यास संबंधित पोलीस ठाण्‍यात रीतसर तक्रार नोंदविण्याचे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीसांनी केले आहे.