भ्रमणध्वनीवर ‘प्लेस्टोअर’मधून ‘एनी डेक्स अ‍ॅप’ डाऊनलोड करायला लावून अडीच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना रविवारी कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे घडली होती. याबाबत सायबर सेलकडे तक्रार येताच अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आणि अडीच लाख रुपयेसुद्धा परत मिळवण्यात यश आले. नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी आज शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा- ५० लाख रुपये खर्चून बांधलेला रस्ता महिनाभरातच उखडला; नागपूर महापालिकेच्या निकृष्ट कामाचा आणखी एक नमुना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील पंकज पिंपराडे यांना एक फोन आला. प्रथम त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा फोन आला. तुम्ही क्रेडीड कार्ड न वापरल्यास बँक खात्यातून पैसे कपात होतील, असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून पिंपराडे यांनी बोलण्याच्या ओघात प्ले स्टोअरमधून एनी डेक्स अ‍ॅप डाऊनलोड केले. ही प्रक्रिया होताच समोरच्या व्यक्तीने क्रेडिट कार्डच्या माहितीसह ओटीपी घेऊन खात्यातून दोन लाख ५४ हजार २५० रुपये उडवले. या प्रकाराची तक्रार कळंब पोलीस ठाण्यात देण्यात आली. ही तक्रार सायबर सेलकडे येताच त्यांनी नोडल अधिकाऱ्यांशी ईमेलवर संपर्क साधून रक्कम परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात दोन लाख १५ हजार रुपये परत आणण्यास यश आले, अशी माहिती अधीक्षक बनसोड यांनी दिली.