अमरावती: सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अटक’ करण्याची भीती दाखवून अमरावती येथील एका ज्येष्ठ वकिलाला ३१ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार दाखल होताच अमरावती शहर सायबर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत फसवणूक झालेली पैकी २४ लाख रुपयांची रक्कम गोठवली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार वकिलाच्या खात्यात यशस्वीरित्या परत जमा केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
येथील ७० वर्षीय वकिलाने ९ ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया’ मधून राहुल कुमार असल्याचे सांगितले. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल असून, आपण लोकांना त्रास देणारे मेसेज व बेकायदेशीर जाहिराती पाठवत आहात, असे खोटे सांगण्यात आले. यासोबतच, नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात २० लाख रुपये कमिशन आणि त्यांचे कॅनरा बँक घाटकोपर, मुंबई येथील खाते विकून ५ लाख रुपये, असे एकूण २५ लाख रुपये मिळाल्याची खोटी बतावणी करून त्यांना धमकावले.
‘पैसे न भरल्यास अटक करण्याची भीती दाखवण्यात आली आणि ‘तुम्ही निर्दोष ठरल्यास पैसे परत मिळतील,’ असे सांगून गोपनीयतेची शपथ घेण्यास भाग पाडले. यानंतर, वेगवेगळ्या शासकीय आस्थापनांच्या कार्यालयांचे बनावट दस्तावेज व्हॉटस्अॅपवर पाठवून या वकिलाच्या मनात मोठा गुन्हा केल्याची भीती निर्माण केली गेली.
आरोपींनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली विविध बँक खात्यांचे तपशील पाठवून कलंत्री यांच्याकडून एकूण ३१ एकतीस लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली.
सायबर पोलिसांची तत्परता
या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण करून, फसवणूक झालेली रक्कम शोधण्यात आली. ३१.५० लाख रुपयांपैकी बँक खात्यात ट्रान्सफर झालेले चोवीस लाख रुपये सायबर पोलिसांनी त्वरित पत्रव्यवहार करून गोठवले. ही गोठवलेली २४ लाख रुपयांची रक्कम तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये यशस्वीरित्या परत जमा करण्यात आली.
पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे आणि पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोटावार, अनिकेत कासार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
