गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने शस्त्रबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर, जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शरणागती पत्करली होती. या शरणागतीनंतर केंद्रीय समितीने भूपतीला ‘गद्दार’ संबोधत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. अखेर, १ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलिसांच्या मदतीने एक चित्रफीत प्रसिद्ध करून भूपतीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘आता परिस्थिती बदलली आहे, शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात या,’ असे आवाहन त्याने या चित्रफितीद्वारे चळवळीतील सक्रिय नक्षलवाद्यांना केले आहे.

भूपतीने आपल्या ६० साथीदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. या महत्त्वपूर्ण घटनेनंतर छत्तीसगडमधील बस्तर येथे जहाल नेता रुपेशसह २१० नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यापाठोपाठ, केंद्रीय समितीचा सदस्य पुल्लरीप्रसाद ऊर्फ चंद्रन्ना आणि तेलंगण राज्य समितीचा सदस्य बंडी प्रकाश ऊर्फ प्रभात यांनी २८ ऑक्टोबर रोजी आत्मसमर्पण केले. या सलग घटनांमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

दरम्यान, केंद्रीय समितीने भूपती आणि रुपेश यांच्या भूमिकेवर ‘गद्दार’ व ‘फितूर’ असे शब्द वापरत तीव्र टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, आत्मसमर्पणानंतर भूपतीने १ नोव्हेंबर रोजी प्रथमच ५ मिनिटे १७ सेकंदांची चित्रफीत प्रसिद्ध केली. यात त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “१६ सप्टेंबर रोजी आपण प्रथम शस्त्रबंदीचा विचार मांडला आणि त्यानंतर ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. हा निर्णय बदललेल्या परिस्थितीला अनुसरूनच घेण्यात आला आहे. बदलत्या परिस्थितीचे संकेत ओळखून, शस्त्रे सोडून कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी काम करण्याचा आम्ही निर्धार केला आहे,” असे भूपतीने म्हटले आहे. केंद्रीय समितीने वापरलेल्या ‘गद्दार’ या शब्दप्रयोगाबद्दल खंत व्यक्त करत त्याने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

“आम्ही घेतलेल्या निर्णयावर चळवळीतील सक्रिय नक्षलवाद्यांनी शांतपणे विचार करावा,” असे आवाहन भूपतीने केले आहे. तसेच, सुज्ञ नागरिक आणि आदिवासी बांधवांनी आमच्या भूमिकेचे समर्थन करून आपले अभिप्राय द्यावेत, असे सांगत त्याने स्वतःचा आणि रुपेशचा मोबाइल क्रमांकही प्रसिद्ध केला आहे.

आणखी एक चित्रफीत येणार

छत्तीसगडमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये चकमकीत ठार झालेला जहाल नेता कट्टा रामचंद्र रेड्डी ऊर्फ राजू दादा याची पत्नी शांतीप्रिया हिने ३१ ऑक्टोबर रोजी एक गंभीर आरोप केले होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनीच आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याचे तिने म्हटले होते. यात तिने भूपती व रुपेश यांचा थेट नामोल्लेख करत टीका केली होती. या आरोपांवर भूपतीने सद्यस्थितीत कोणताही खुलासा केलेला नाही, मात्र आपण लवकरच आणखी एक चित्रफीत प्रसिद्ध करणार असल्याचे त्याने नमूद केले आहे. त्यामुळे या पुढील चित्रफितीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.