नागपूर : गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात बी. ए. तृतीय सत्राच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात राजकीय विचारवंत म्हणून मनू, भीष्म आणि बृहस्पती यांच्यावरील प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, ही बाब उघड होताच शुक्रवारी दिवसभर सर्व स्तरातून आक्षेप नोंदवण्यात आले. अखेर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विशेषाधिकाराचा वापर करीत अभ्यास मंडळाचा निर्णय रद्द केला व मनू, भीष्म आणि बृहस्पती यांना अभ्यासक्रमातून वगळले.
राज्यातील अकृषक विद्यापीठांमध्ये २०२४ पासून पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन अभ्यासक्रमही तयार केला जात आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने गोंडवाना विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाने तृतीय सत्रासाठी तातडीने नवीन अभ्यासक्रम तयार केला. त्यात मनुस्मृती लिहिणाऱ्या मनू ऋषीचा राजकीय विचारवंत म्हणून समावेश करण्यात आला.
यासोबतच महाभारतातील भीष्म, बृहस्पतीस्मृती ग्रंथाचे लेखक बृहस्पती आणि शुक्रनीती या नीतिग्रंथाचे लेखक शुक्र यांचाही समावेश होता. ही बाब उघड होताच शुक्रवारी सकाळी समाज माध्यमांवरून या प्रकाराला जोरदार विरोध सुरू झाला. अधिसभा सदस्य डॉ. दिलीप चौधरी यांनीही अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहून निषेध केला. त्यानंतर डॉ. बोकारे यांनी तात्काळ कुलगुरूंना असलेल्या अधिकाराचा वापर करत मनू, भीष्म आणि बृहस्पती यांची प्रकरणे अभ्यासक्रमातून वगळली.
अभ्यासक्रमात नेमके काय होते?
राज्यशास्त्र तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात राज्याच्या निर्मितीसंदर्भात मनूचे विचार, न्याय आणि राजा याविषयीचे मनूचे विचार, राजधर्माविषयीचे भीष्माचे सांगितलेले विचार, शांतीपर्वासाठी सांगितलेले महत्त्वाचे राजकीय तत्त्वज्ञान यांचा समावेश होता. दुसऱ्या प्रकरणात शुक्र आणि बृहस्पती यांचे राजकीय तत्त्वज्ञान आणि राज्याची कर्तव्य शिकवली जाणार होती. यासोबतच पूर्ण सत्ता असताना होणारी टीका आणि त्यावर बृहस्पतीचे विचार, याचाही समावेश होता.
‘भारतीय संविधानाच्या मूल्यांशी हे सुसंगत नाही’
कुठल्याही विषयाचा अभ्यासक्रम हा येणाऱ्या अनेक पिढ्यांचे भविष्य घडवत असतो. त्यामुळे बहुसंख्य नागरिकांचे माणूसपण नाकारणाऱ्यांचा अभ्यासक्रमात समावेश होणे चुकीचे आहे. भारतीय संविधानाच्या मूल्यांशी हे सुसंगत नाही, अशा शब्दात गोंडवाना विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. दिलीप चौधरी यांनी आक्षेप नोंदवला.
‘विशेषाधिकाराचा वापर करून आक्षेपार्ह विषय वगळले
अभ्यासमंडळाच्या सदस्यांनी अभ्यासक्रम तयार केला होता. मात्र, ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच तात्काळ विशेषाधिकाराचा वापर करत आक्षेपार्ह विषय अभ्यासक्रमातून वगळण्यात आले, असे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी स्पष्ट केले.