गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूरपासून दोन किलोमीटरवरील ताटीगुडम गावात ४ सप्टेंबरला आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. गावातील एका विहिरीला चक्क गरम पाणी येत असून त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. तालुका प्रशासन याबाबत अनभिज्ञ असून भूगर्भातील उष्ण खडकाचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सत्यांना मलय्या कटकु (रा. ताटीगुडम) हे शेती करतात. घराजवळच त्यांनी विहीर खोदलेली आहे. यंदा मुसळधार पाऊस झाल्याने त्यांच्या विहिरीलाही पाणी आले. ४ सप्टेंबरला त्यांच्या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. ही वार्ता पाहता- पाहता संपूर्ण परिसरात पोहोचली. अनेकांनी विहिरीजवळ गर्दी केली. हे पाणी एवढे गरम आहे की त्यात थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येत नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शिवाय विहिरीत बुडबुडे येत असून वाफही येताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. वैज्ञानिक दृष्टीने याचा योग्य तो निष्कर्ष काढणे गरजेचे आहे.
प्रशासन अनाभिज्ञ
यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना संपर्क केला असता त्यांनी मला या घटनेची माहिती नाही, असे सांगितले. यासंदर्भात माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले, पण उशिरापर्यंत त्यांनी याविषयी कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.
दगडांनी बांधलेली विहीर असेल किंवा विहिरीच्या भूगर्भात दगड अधिक असतील तर उन्हामुळे तापमान वाढते व पाणी गरम हाेते. याशिवाय जमिनीत गंधकाचे प्रमाण अधिक असेल किंवा ज्वालामुखी असेल तर तापमान वाढून पाणी गरम हाेते. – प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरणतज्ज्ञ तथा भूगर्भ अभ्यासक