गडचिरोली : राष्ट्रीय तपास यंत्रणेला हवा असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. शंकर भिमा महाका (वय ३२, रा. परायणार, ता. भामरागड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल्याचे नाव असून पोलिसांनी भामरागड तालुक्यातील तिरकामेटा जंगल परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.

शनिवारी (१३ सप्टेंबर) ताडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष अभियान पथक नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना जवानांना एक संशयित व्यक्ती दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन अहेरी येथील प्राणाहिता पोलीस उपमुख्यालयात आणण्यात आले. चौकशीत त्याची ओळख शंकर महाका अशी पटली. तो भामरागड दलमचा सदस्य असून, घातपाताच्या उद्देशाने तिरकामेटा जंगलात रेकीसाठी गेला होता, असे तपासात स्पष्ट झाले.

२१ जानेवारी २०२२ रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज–इरेर मार्गावरील पेनगुंडा रस्त्याच्या कामावर असलेली तब्बल १९ वाहने नक्षल्यांनी पेटवून दिली होती. सुमारे २ कोटी रुपयांच्या या जाळपोळ प्रकरणात शंकर महाकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो २०१६ ते २०२२ या काळात नक्षल्यांच्या जनमिलिशियामध्ये कार्यरत होता. नंतर त्याने भामरागड दलममध्ये प्रवेश केला. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी १०९ नक्षल्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे.

दिनेश गावडे खून प्रकरणात आरोपी

१ नोव्हेंबर २०२३ रोजी लाहेरी येथील दिनेश पुसू गावडे याचा पेनगुंडा येथे नक्षल्यांनी धारदार शस्त्रांनी खून केला होता. या गुन्ह्यात धोडराज पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. पुढे ऑक्टोबर २०२४ मध्ये हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर या खटल्यात चार आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. शंकर महाका हा त्याच प्रकरणातील वाँटेड आरोपी होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्राणाहिता) सत्य साई के., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि भामरागडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.