गडचिरोली : नक्षलवादाची समस्या केवळ बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही, तर विकासाची गंगा आणि ज्ञानाचा प्रकाश दुर्गम भागात पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे, हा विचार गडचिरोली पोलीस दलाने कृतीत आणला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एक गाव, एक वाचनालय’ या उपक्रमाने आता ७३ वा टप्पा गाठला आहे. २५ ऑक्टोबरला हेडरी उपविभागातील अतिदुर्गम अशा वांगेतुरी येथे सुसज्ज सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आणि महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणे आणि स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सन २०२३ पासून सुरू झालेल्या या ज्ञानयज्ञातून यापूर्वी स्थापन झालेल्या ७२ वाचनालयांचा लाभ ८५०० हून अधिक युवक-युवती घेत आहेत. विशेष म्हणजे, या माध्यमातून आत्तापर्यंत २०५ विद्यार्थी शासनाच्या विविध विभागांमध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत.

वांगेतुरी येथील या ७३ व्या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, याची निर्मिती गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी व जवान तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने, श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून करण्यात आली आहे. आज पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील प्रमुख मार्गावरून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आणि वाद्य वाजवून उत्साहाने सहभाग घेतला. ५०० हून अधिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वाचनालयात स्वतंत्र अभ्यासिका, टेबल, खुर्च्या, पुस्तकांची कपाटे अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यावेळी बोलताना नीलोत्पल म्हणाले, या वाचनालयाचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. येथील तरुण प्रशासकीय क्षेत्रात जावेत, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, याच उद्देशाने ही निर्मिती केली आहे.

गडचिरोली पोलीस दल केवळ नक्षलवादाविरुद्ध लढा देत नसून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीही कटिबद्ध आहे.” पोलिसांच्या या प्रभावी नागरी कृती उपक्रमांमुळे मागील पाच वर्षांत जिल्ह्यातून एकाही तरुणाने नक्षलवादी संघटनेत प्रवेश केला नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी सीआरपीएफ १९१ बटालियनचे असिस्टंट कमांडण्ट मनोज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजणकर, पोस्टे वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे यांच्यासह अनेक मान्यवर, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.