नागपूर : रविवारी नागपूरच्या बिअर बारमध्ये शासनाच्या फाईल्स घेऊन बसलेले व त्यावर स्वाक्षरी करणारे कोण ? याबाबत दोन दिवस उत्सूकता शिगेला पोहोचली होती. ते नागपूरमधील सरकारी कर्मचारी आहेत की बाहेरगावहून नागपूरमध्ये आलेले आहेत ? त्यांचा विभाग कोणता ? असे एक ना अनेक प्रश्न यातून निर्माण झाले होते. पोलीस यंत्रणा त्यांचा तपास घेत होती,अखेर दोन दिवसांनी त्यांचा शोध लागला.
नागपूरमध्ये एका बिअरबारमध्ये बसून काही व्यक्ती सरकारी फाईल्सवर स्वाक्षरी करीत आहे,असा व्हीडीओ रविवारी समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईल्स नेमक्या कोणत्या विभागाच्या होत्या व ते कर्मचारी कोण याबाबत सोमवारी दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्तांशी संपर्क साधला होता. तसेच पोलिसांच्या सायबर शाखेसोबतही चर्चा केली होती व यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळे चक्क बिअरबारमध्ये सरकारी फाईल्स घेऊन कोण गेले होते. त्या फाईल्स कोणत्या विभागाशी संबंधित होत्या असे अनेक प्रश्न दोनदिवसांपासून विचारले जात होते.
नागपूर हा खुद्द मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. याच जिल्ह्यात या घटनेमुळे प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. त्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आले होते. सोमवारी रात्री बारमध्ये बसलेले कर्मचारी नागपूरचे नव्हे तर बाहेरगावचे आहेत,असे सुतोवाच अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र नागपूर बाहेरचे म्हणजे कोणत्या जिल्ह्याचे याबाबत स्पष्टता नव्हती. त्याच प्रमाणे ते कर्मचारी कोणत्या विभागाचे आहेत याबाबतही संभ्रम कायम होता. त्यामुळे मद्यपी कर्मचारी कोण याबाबत उत्सूकता शिगेला पोहोचली होती.
मंगळवारी सांयकाळी या प्रकरणावरील पडदा अखेर बाजूला झाला. नागपूरच्या मनीषनगरमधील बारमध्ये सरकारी फाईल्स घेऊन बसलेले कर्मचारी हे गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची माहिती बाहेर आली. तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्या सर्व फाईल्स संबंधित विभागाने मागवून घेतल्या आहेत. सरकारी कार्यालयाच्या बाहेर महत्वाच्या फाईल्स नेणे हा सरकारी गोपनीयता कायद्याचा भंग ठरतो, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोवाच कालच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता नेमकी कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.