गडचिरोली : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गडचिरोली ते आरमोरी आणि गडचिरोलो ते चामोर्शी या दोन ३५३ राष्ट्रीय महामार्गसह १५ मार्ग बंद झाले आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा-कुरंझा मार्गावर असलेल्या नाल्याच्या पाण्यात बांधकाम मजूर सायकलसह वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. राजू विश्वनाथ तुमराम (४५), रा. कुरंझा असे वाहून गेलेल्या मजुराची नाव आहे. तर पाण्यात अडकलेला दोन बसेसची सुखरूप सुटका करण्यात आली.
८ जुलै रोजी रात्री महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बस अडकून पडल्या होत्या. पाण्यातून जाताना दोन्ही बसांचे इंजिन पाण्यामुळे बंद पडल्याने वाहने जागेवर थांबली होती. जिल्हा प्रशासनाने तात्काळ जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने दोन्ही बस बाहेर काढल्या असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. गडचिरोली–आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे एक खाजगी बस खोलवर अडकली होती. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ जेसीबी व हायवा घटनास्थळी पाठवून बचावकार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमच्या मदतीने ही बस बाहेर काढण्यात आली.
त्याचप्रमाणे, गडचिरोली–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गाढवी नदीजवळ पुलाच्या अलीकडे एस.टी. महामंडळाची एक बस देखील इंजिन मध्ये पाणी गेल्याने बंद पडून अडकली होती. या बसमध्ये २३ प्रवासी होते. येथेही प्रशासनाने त्वरित जेसीबी पाठवून बसला बाहेर काढले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पाण्याचा प्रवाह असलेल्या सर्व रस्त्यांवर कोणतीही वाहनं पाण्यातून जाऊ नयेत यासाठी पोलिस प्रशासनाला तातडीने बॅरिकेटिंग लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळी हवामानात नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
गडचिरोली- आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ (खोब्रागडी नदी), कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग ३१४ (भीमपूर नाला), कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७, मांगदा ते कलकुली, कढोली ते उराडी, चातगाव रांगी पिसेवाडा, आमिर्झा-मौशीखांब, गोठनगडी चांदागड सोनसरी, कुरखेडा तळेगाव चारभट्टी, आंधळी नैनपुर (सती नदी), भेंडाळा-अनखोडा, शीवणी-चांदागड-शिरपूर, मौशीखांब-वैरागड-कोरेगाव, शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप, आष्टी -उसेगाव-कोकडी -तुलसी-कोरेगाव, मालेवाडा-खोब्रामेंढा, वैरागड-देलनवाडी, चौडमपल्ली-चपराळा,अरसोडा कोंढाळा-कुरूड -वडसा हे मार्ग बंद आहेत.