गडचिरोली : मागील काही महिन्यांपासून सिरोंचा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत तब्बल २९ कोटींचा दंड प्रस्तावित केला आहे.
‘लोकसत्ता’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तत्काळ दखल घेत कारवाई केली. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी चौकशीआधीच या संदर्भातील वृत्त निराधार असल्याचा खुलासा केला होता. या कारवाईमुळे त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केल्या जात आहे.
सिरोंचा विभागात सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करीची बाब माध्यमानी लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांना याबाबत विशेष तपासणी करण्याच्या निर्देश दिले होते. कुशल जैन यांच्या पथकाने ०२ ऑक्टोंबर, २०२५ रोजी अंकिसा माल, चिंतरेवला व मद्दीकुंठा येथे तपासणीची कारवाई केली. यावेळी अंकिसा माल येथे सर्व्हे नंबर ९०८ मधील वाळू साठ्यात ६४ ब्रास आणि सर्व्हे नंबर ६९० व ६९१ मधील साठ्यात ५९ ब्रास वाळूची तफावत (कमी साठा) आढळली आहे. या दोन्ही प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे.
तर मद्दीकुंठा येथील सर्व्हे नंबर ५३३ मध्ये परवानगी असलेल्या ठिकाणी भेट दिली असता, वाळूसाठा दुसऱ्याच जागेवर म्हणजेच सर्व्हे नंबर ३५६ जागेवर असल्याचे आढळले. मोजमाप अहवालानुसार, या ठिकाणी एकूण १५ हजार ६६५ ब्रास वाळूसाठा दिसून आला. साठवणूक आणि वाहतुकीसाठी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्यामुळे, हा साठा अवैध घोषित करून जप्त करण्यात आला.
याशिवाय, गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली २ जेसीबी मशीन, १ पोकलैंड मशीन आणि ५ ट्रक ही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या १५,६६५ ब्रास अवैध साठ्यासाठी प्रति ब्रास १८,६०० दंड (पेनल्टी) प्रमाणे एकूण अंदाजित रक्कम २९ कोटी ३६ लाख ५६ हजार ८०० रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
तहसीलदार, खनिकर्म अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद
गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरु आहे. या संदर्भात अनेक तक्रारीही करण्यात आल्या. मात्र, सिरोंचा तहसीलदारांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले. त्यामुळे हा घोटाळा उजेडात आला. दुसरीकडे जिल्हा खणीकर्म अधिकारी चौकशी न करता सर्व काही सुरळीत असल्याचा खुलासा करतात. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्या जात आहे.