यवतमाळ : गुन्हेगारी क्षेत्रानेही इन्स्टाग्राम, फेसबुक आदी समाज माध्यमांचा वर्चस्व व दहशत पसरविण्यासाठी वापर सुरु केला आहे.इन्स्टाग्रामवर गुंड प्रवृतीच्या लोकांनी विविध समूह निर्माण केले आहे. दहशत पसरविणाऱ्या अशा टोळक्यांचा समाचार घेत पोलिसांनी म्होरक्यांवर कारवाई सुरु केली आहे.या कारवाईमुळे अल्पवयीन मुलांचे अशा टोळींबद्दल आकर्षण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात विविध गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी सतत संघर्ष सुरू असतो.
वर्चस्वासाठी दहशत पसरिवण्याचे काम या टोळ्या इन्स्टाग्रामवरून करतात. यासाठी टोळक्यांनी इन्स्टाग्रामवर विविध ग्रुप, कंपन्यांच्या नावाने खाते उघडले. त्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, विविध शस्त्रांच्या वापराचे रिल्स टाकून दहशत पसविण्यात येत होती. ही बाब लक्षात येताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी समाज माध्यमातून दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या अशा टोळक्यांची माहिती घेवून दोन दिवस शोध घेतला. सायबर पेट्रोलिंग व इतर अद्ययावत तांत्रिक बाबींचा उपयोग करून जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची कुंडली तयार केली.
जे गुन्हेगार समाज माध्यमांतून दहशत पसरवितात, धमक्या देतात, रिल्स, फोटो टाकतात त्याची माहिती गोळा करून गुरूवारी त्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. रिल्स टाकून दहशत पसरविणारे खाते चालविणाऱ्या ॲडमिनला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १३ सराईत गुन्हेगारांच्या टोळक्यांकडून समाज माध्यमांवर धमकावणारे व्हिडीओ, रिल्स टाकले जात असल्याचे आढळले.
पोलिसांनी दोन दिवस या सर्वांचा पोलिसी पाहुणचार करत कारवाई केली. यात ए.आर. कंपनी, बकासूर टोळी यवतमाळ, ३६ खतम, ए.पी. कंपनी, जिगरी ग्रुप, एफएफजी कंपनी, एस.डब्ल्यु. कंपनी, ए.पी. कंपनी ३०२ अशा प्रकारचे ग्रुप तयार करून त्यावर रिल्स, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या १३ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या सर्वांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाणार नाही किंवा सामाजिक शांतता धोक्यात येणार नाही, यासाठी समज देण्यात आली.
हे टोळके ज्या ठिकाणी रिल्स, व्हिडीओ बनवतात त्या ठिकाणी पोलीस प्रत्यक्ष जावून आले. टोळक्यांच्या या आवडत्या ठिकाणांवर आता पोलीस पेट्रोलिंग करणार असून, भविष्यात अशा प्रकारचे व्हिडीओ, रिल्स तयार करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने केली.
भविष्यात कोणत्याही गुन्हेगाराने समाज माध्यमांवर आक्षेपाई पोस्ट टाकल्यास नगारिकांनी सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे.