नागपूर: नागपूर जिल्यातील रामटेक येथे लाच घेताना सापडलेली आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ हिचा पहिल्या प्रकरणातील निकाल प्रलंबित आहे. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसऱ्या लाच प्रकरणात शेजवळ लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आरटीओ विभागातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ ही चार दिवसापूर्वी पहिल्या दुसऱ्यांदा एसीबीच्या सापळ्यात अडकली आहे. ३ हजार रुपयांची लाच दलालाच्या माध्यमातून घेतांना अहिल्यानगर एसीबीच्या सापळ्यात ती अडकली आहे. ही तिची पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा ती विदर्भात नागपूर जिल्ह्यात कार्यरत असताना एसीबीच्या तावडीत सापडलेली आहे. ह्यावरून ही अधिकारी वारंवार गंभीर प्रकरणात अडकत असतांनाही तिच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
श्रीरामपूर येथील खासगी व्यक्तीविरूध्द छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यात गीता शेजवळ व खासगी व्यक्ती इस्माईल नवाब पठाण अडकले. दोघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याला तक्रारदारांकडून तीन हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदाराने बुधवारी (२४ सप्टेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांचे ओव्हरलोड सिमेंटचे वाहन पाटस येथून अहिल्यानगर येथे सोडण्यासाठी तीन हजार रूपये लाच मागणी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या तक्रारीच्या पडताळणीत, खासगी इसम इस्माईल पठाण याने तक्रारदाराकडे तीन हजार रूपयांची लाचेची मागणी केली आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. पठाण याने ही रक्कम चांदणी चौक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे पंचासमक्ष स्वीकारली. या प्रकरणात मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने कारवाई करताना पठाण यास रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारण्याची संपूर्ण रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली होती.
नागपूर जिल्यातील प्रकरण काय ?
एसीबीच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे वर्ष २०२३ मध्ये आरटीओ अधिकारी गीता शेजवळ हिला लाचेची डिमांड करून ती स्वीकारतांना पकडले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
शेजवळ यांना कुणाचे पाठबळ
२०२३ मध्ये गीता शेजवळ नागपूर विभागात असताना एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकल्यावर तिला निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधी संपुष्टात आल्यावर कोणत्याही अधिकाऱ्याला ‘एक्झिक्युटिव्ह’ पोस्टला न बसविता ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ पोस्टला देण्यात येते. मात्र शेजवळ यांचा निलंबन कालावधी संपताच तिला पुन्हा एक्झिक्युटिव्ह पोस्टला बसवले गेले. त्यामुळे तिच्यामागे कोण वरिष्ट अधिकारी आहेत, हा प्रश्न परिवहन विभागात विचारला जात आहे.