ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेचे प्रमुख दिलीप देवधर यांचा संकल्प; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
नवीन पिढीमध्ये वाचनासोबत ऐकण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ज्ञानयोद्धा व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून वैचारिक देवाणघेवाणीसोबतच शहराला ज्ञानपूर करायचे आहे, असा संकल्प प्रसिद्ध उद्योजक आणि ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेचे प्रमुख दिलीप देवधर यांनी व्यक्त केला.
नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या व्याख्यानमालेला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दिलीप देवधर यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी देवधर म्हणाले, आज माहिती व तंत्रज्ञान विकसित होत आहे. याची पुढची ज्ञानधिष्ठित संस्कृती प्रभावी बनत आहे. आज भारतात कृषी, औद्योगिक व संपर्क तंत्रज्ञान या सर्व संस्कृती अस्तित्वात आहेत व त्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेले तत्त्वविचारही आपापला प्रभाव निर्माण करू पहात आहे. या पाश्र्वभूमीवर भविष्यकालीन भारतासाठी यापैकी कोणते विचार ग्राह्य़ आहेत, कोणते त्याज्य आहेत व कोणत्या नव्या विचाराचा अवलंब केला पाहिजे, यावर मंथन करण्यासाठी ही ज्ञानयोद्धा व्याख्यानमाला आहे. एकविसाव्या शतकात संपर्क तंत्रज्ञानातील पुढील ज्ञानसंस्कृती जगाचा चेहरा बदलेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसांचे महत्त्व केवळ डाटा पुरवणारी एक वस्तू एवढय़ापुरती मर्यादित झाली आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर बाजारपेठीय तत्त्वज्ञान विशिष्ट मागण्यासाठी निर्माण झालेला एक कळप यापलीकडे माणसाला महत्त्व देणार नाही. या पाश्र्वभूमीवर या ज्ञानयोद्धा व्याख्यनमालेला वेगळे महत्त्व आहे. धरमपेठ महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून दर आठवडय़ात शनिवारी ही व्याख्यानमाला सुरू असून वेगवेगळ्या विषयावर त्या त्या क्षेत्रातील मान्यवर येऊन विचार मांडत असतात. केवळ व्याख्यान नाही तर उपस्थित असलेल्या लोकांशी प्रश्नोत्तराच्या रूपाने संवाद होत असतो.
महाविद्यालयीन जीवनापासून सुरू करण्यात आलेला व्याख्यानाचा उपक्रम वेगवेगळ्या संस्थाच्या माध्यमातून राबवला जात आहे. त्यामागचा उद्देश हा उद्बोधन आणि अभ्यास वर्ग असाच आहे. नवीन पिढी या व्याख्यानमालेकडे वळावी, यासाठी त्यांच्या सोयीचे किंवा ज्यातून उद्बोधन होईल असे विषय ठेवण्यात येतात. काही व्याख्यानांना तरुणांची गर्दी होते. ही व्याख्यानमाला नाही तर ज्ञानयज्ञ आहे. या यज्ञामध्ये जितक्या आहुती पडतील तितका तो तेजाळेल. या ५१ वर्षांत राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील १ हजारच्या जवळपास वक्तयांना विविध विषयांवर व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात आले. आमच्या व्याख्यानमालेत कोणीही पदाधिकारी व्यासपीठावर बसत नाही, हार गुच्छे देऊन स्वागत नाही. केवळ अभ्यास वर्ग म्हणून या व्याख्यानमालेकडे बघत असतो. महाराष्ट्र व्यावसायिक उद्योजक व्यावसायिक क्लब, भारतीय शेअर होल्डर क्लब, भारतीय युवक संघ, इंटलेक्च्युअल कमांडो क्लब आदी संस्थेच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे, असेही देवधर म्हणाले.
..अन् व्याख्यानमालेला अलोट गर्दी झाली
१९९५ मध्ये रवींद्र सभागृहात पाडव्याच्या दिवशी राम शेवाळकर यांचे ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेत दुपारी ३ वाजता व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी शेवाळकर यांना दुपारी लोक येतील का, याबाबत
शंका होती. मी त्यांना नर मादी ते पती पत्नी या विषयावर बोलण्याची विनंती केली. त्यावेळी व्याख्यानाला पती-पत्नीलाच प्रवेश अशी अट टाकली होती. या व्याख्यानाला इतकी गर्दी झाली की लोकांना सभागृहाबाहेर बसावे लागले होते. त्यावेळी त्यांना ‘वाङ्मय वाचस्पती’ ही पदवी दिली होती. त्या काळात श्रीकांत जिचकार यांना ज्ञानयोगी तर नी.र. वऱ्हाडपांडे यांनी तर्कविधी ही पदवी दिल्याचेही देवधर यांनी सांगितले.