चंद्रपूर जिल्हा परिषद शाळांमधील नवरत्न स्पर्धेत निवड झालेल्या तसेच विज्ञान प्रदर्शनीमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेव्दारे मोठे ‘गिफ्ट’ दिले जाणार आहे. नवरत्नचे ३६ तसेच विज्ञान प्रदर्शनीच्या ३० विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद स्व:खर्चाने इस्रो भेटीला नेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, विज्ञान प्रदर्शनीतील विद्यार्थी विमानाने तर नवरत्नचे विद्यार्थी रेल्वेने जाणार आहे.

हेही वाचा >>>“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात,” चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांनी यासाठी..”

मागील काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांकडे काही पालकांचा बघण्याचा दृष्टिकाेन बदलला आहे. अनेकांनी इंग्रजी शाळांमध्ये पाल्यांना दाखल केले आहे. या स्पर्धेमध्येही जिल्हा परिषद शाळा तग धरून आहे. दरम्यान, विविध उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यावर भर दिला जात आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने नवरत्न स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत ३६ विद्यार्थी विजयी झाले आहे. तर, विज्ञान प्रदर्शनीमध्ये ३० विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण कलाकृती सादर केल्या. या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, शिक्षकांनाही आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषद स्व:खर्चाने विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ भेटीला पाठविणार आहे. विशेष म्हणजे, इस्त्रोमध्ये विविध ठिकाणीही विद्यार्थी भेट देत माहिती जाणून घेणार आहे.

हेही वाचा >>>शिक्षक की राक्षस! दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार; बुलढाण्याच्या मिलिटरी स्कूलमधील घृणास्पद प्रकार

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त दहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या संकल्पनेतून नवरत्न स्पर्धा सुरू करण्यात आली. ती आजतागायत सुरू आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांना कलागुण सादर करता येत आहेत. यामध्ये कथाकथन, स्वयंपूर्त भाषण, वादविवाद, एकपात्री नाटक, बुद्धिमापन, सुंदर हस्ताक्षर, स्वयंपूर्त लेखन, स्मरणशक्ती, चित्रकला या स्पर्धांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना विज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये पाठविले जाणार आहे. यासाठीची संपूर्ण खर्च प्रशासन करणार आहे. विज्ञान प्रदर्शनीतील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण प्रवास विमानाने करण्याचे नियोजन केले आहे.- विवेक जाॅन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर