गोंदिया: जिल्ह्यात २५ व २६ ऑक्टोबरनंतर पुन्हा ३० ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या अधिक उत्पादनाच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. कापून ठेवलेल्या धानाच्या कडपा काळ्याकुट्ट झाल्या आहेत त्यांना अंकुर फुटले आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरावी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह राजकीय पुढारी आणि विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
गोंदिया जिल्हा हा राज्यातील प्रमुख धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सुमारे ९५ टक्के शेतकरी आपला प्रमुख व्यवसाय म्हणून धानपिकाची लागवड करतात. परंतु यंदाच्या हंगामात निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्या असून, उभ्या पिकालाही मावा व तुडतुडा लागला आहे. परिणामी, उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. धानाच्या दाण्यांची गुणवत्ता घटली असून, विक्रीयोग्य धानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात २५ ऑक्टोबरपासून सातत्याने परतीचा पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील शेतकरी कमी कालावधीच्या धानाची कापणी व मळणी करीत आहेत. बुधवारी दुपारी व संध्याकाळी अनेक भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही पहाटेपासूनच वादळवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले.
धानपीक जोमात असताना तुडतुडा, मावा, करपा आदि रोगाने धानपिकावर आक्रमण केले, कीटनाशकांची फवारीणी करून रोग आटोक्यात आणण्यात शेतकऱ्यांना यश आले. मात्र दिवाळीनंतर आलेल्या परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. अधिक कालावधीचे धान परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पाऊस व वादळाच्या फटक्याने भुईसपाट झाले आहे. काही ठिकाणी तर कापणी केलेल्या धानाला अंकूर फुटले आहे. दरम्यान, शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह राजकीय पुढारी आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
आमदार विजय रहांगडाले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
आधीच खत, बियाणे व मजुरीचा खर्च वाढलेला असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा संकटात टाकले आहे. हलक्या व भारी धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त धानपिकाचे ताबडतोब सर्वेक्षण करून तसा अहवाल शासनाकडे पाठवावा, याबाबतचे पत्र आमदार विजय रहांगडाले यांनी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
कापून ठेवलेल्या धानाच्या कडपाना फूटले अंकुर
सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उभे धानपीक पूर्णतः भूईसपाट झाले आहे. कडपांना अंकुर फुटले आहे. राका, चिखली, कोकणा, कन्हेरी, मनेरी, सौंदड, फुटाळा, खोबा आदीसह अनेक गावांतील धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाकडून पंचनामे करणे सुरू झाले आहे.
आमदार राजकुमार बडोले यांनी केली पाहणी
नवेगावबांध परिसरात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या धानपिकाची आमदार राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी आमदार बडोले यांच्याकडे केली. नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव, देवलगाव, कवठा, धाबेपवनी राजोली, भरनोली, तुकुमनारायण, महागाव, खामखुरा, इटखेडा, इसापूर, अरुणनगर, मांडोखालटोला या परिसरासह संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच निसगनि घाला घातला आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी सुलोचना पाटोळे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, राजेंद्र संग्रामे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती चौधरी तसेच लोकपाल गहाणे, अविनाश काशीवार, होमराज पुस्तोडे, सरपंच दीपाली कापगते, उपसरपंच सरिता लंजे, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष किशोर तरोणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
