गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वार्षिक महोत्सव म्हणजे धानाची रोवणी. आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस नसल्याने रोवणी आता पर्यंत सुरू झालेली नव्हती. मात्र, ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. या रोवणी उत्सवाने शेतकऱ्यांच्या आनंदाला चांगलेच भरते आले आहे. हा आनंद शिवारातूनही ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर शिवारात अधूनमधून लोकगीतांचे मधुर स्वर कानी पडत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात धान पीक हेच प्रमुख पीक आहे. धान या पिकावरच जिल्ह्याची अर्थव्यवस्था आणि वार्षिक गणिते अवलंबून आहेत. शेतकरी कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा, मुला-मुलींचे लग्नकार्य, औषधपाणी, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन आदी अनेक बाबींचा यात समावेश आहे. या धानाच्या हंगामासाठी अगोदर पेरणी टाकावी लागतात. साधारणतः जून च्या १५ तारखेनंतर पेरणी टाकण्यास सुरुवात होते. जुलैच्या २, ३ तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पेरणी टाकली जातात. पेरणी ला १५ ते २० दिवस झाले आणि योग्य पाऊस पडला, तर या
प-ह्यांची रोवणी करण्यात येते.
गोंदिया जिल्ह्यात मात्र जून महिना कोरडाच गेला व २७ जून पासून काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने जुलै महिन्याचा पहिला आठवडा ही तसाच गेला. अशातच सोमवार पासून ७ जुलै पासून दमदार पावसाने एंट्री मारली असून, आता अवघा जिल्ह्याच जलमय झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. तर ज्यांनी सिंचनाची सोय बघून नर्सरी लावली होती त्यांनी रोवणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. या रोवणीच्या कामात माणसाला ४०० रुपये मजुरी असते. तर महिला वर्गाकडून गट स्थापन करून एकरी प्रमाणे पेरणी व नंतर रोवणी केली जाते.
सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात रेलचेल
शेतीची इतर कामे व काही प्रमाणात रोवणीच्या हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामात एवढे व्यस्त झाले आहेत की त्यांना क्षणाचीही उसंत नाही. अगदी सकाळी ७ वाजता पासून शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामास लागत असून, सायंकाळी ६-७ वाजता मोकळे होतात. एरव्ही २०० रुपये असणारी एका बाईची एका दिवसाची मजुरी २५० रुपयांपर्यंत जाते. माणसाला ४०० रुपये मिळत असतात.
शेतीतून चार महिने काम
शासन मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या कितीही सांगत असले तरी हे खरे नाही. जिल्ह्यातील मजूर वर्गाला सतत तीन महिने काम देण्याची शक्ती फक्त शेती आणि शेतीतच आहे. पेरणी झाल्यानंतर रोवणीचा हा हंगाम साधारणतः २५ ते ३० दिवस, त्यानंतर निंदन, धान कापणी यात मजुरांना नियमित रोजगार मिळत असतो. याशिवाय ट्रॅक्टर, कृषी केंद्र यांचेही अर्थचक्र गती पकडत असते.