गोंदिया : “धानाचे कोठार “अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक धान आहे. धानाच्या लागवड क्षेत्रात दरवर्षी वाढ होत चालली आहे. सिंचनाची सोय हे त्यामागील एक कारण आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
गोंदिया जिल्ह्यातील तांदळाला मोठ्या प्रमाणात राज्यात आणि राज्याबाहेर मागणी आहे. येथील माती आणि हवामान धान शेतीकरिता अनुकूल आहे. त्यामुळे दरवर्षी धानाच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून सिंचन सुविधा वाढीसाठी प्रयत्न झाले नाही,पण शेतकऱ्यांनी स्वतः सिंचनाची सोय केली आहे. तर पडीक असलेली जमीन देखील लागवडी खाली आणण्याची उपाययोजना केली आहे. परिणामी, २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात एक लाख ७० हजार ३२५ हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती.
तर २०२१-२२ मध्ये एक लाख ७२ हजार ८८४ हेक्टर, २०२२-२३ मध्ये एक लाख ७३ हजार १२२ हेक्टर, २०२४-२५ मध्ये एक लाख ८० हजार ९२७ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या हंगामात दोन लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४० हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजनदेखील केले आहे. यासाठी जवळपास १९ हजार हेक्टरवर नर्सरी लावली जाते.
७,८ आणि ९ जुलै या गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरणीची कामे आटोपली आहेत. आता मात्र रोवणीच्या कामांनी वेग आला आहे. पेरणी क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असली तरी प्रत्यक्षात बदलत्या वातावरणाचा दरवर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. धानाच्या लागवड खर्चातही वाढ होत आहे. हवामानातील बदलामुळे धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. दरवर्षी पाऊस कधी पेरणीच्या वेळी तर कधी धान कापणीच्या वेळी दगा देत असून उत्पादनात घट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
” जिल्ह्यातील माती आणि वातावरण धान पिकाला पोषक आहे. पावसाचे प्रमाणदेखील चांगले आहे. त्यामुळे धान पीक चांगले येते. शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करताना वेळोवेळी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करून जमिनीचा पोत सुधारणे गरजेचे आहे.” – नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी गोंदिया.